प्रतिनिधी , मुंबई : प्रथा, परंपरा बदलत्या काळाशी सुसंगत असाव्यात, असा समाजप्रबोधनाचा संदेश आपल्या कृतीतून उतरवत आणि मातृवियोगाचे दु:ख बाजूला ठेवत तीन दिवसांच्या दुखवट्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) पुन्हा कोरोनाच्या (Corona) लढ्यात उतरले आहेत. मंगळवारी संध्याकाळीच त्यांनी जालना जिल्ह्यातील अंबड येथील कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली.
तर बुधवारी मुंबईत आल्यानंतर दैनंदिन बैठका घेऊन कामकाजाला सुरुवात केली. आईने शेवटच्या काळात पाठीवर दोन्ही हात ठेवून आशीर्वाद दिल्याचे सांगतानाच आता ह्याच आशीर्वादाच्या बळावर पुन्हा जोमाने कोरोनाविरुद्धच्या लढाईत उतरलो असल्याची भावना आरोग्यंत्र्यांनी व्यक्त केली आहे. ग्रामीण भागात आजही कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर १४ दिवसांचे सुतक पाळताना सदस्यांनी कामकाज न करता घरातच राहण्याची प्रथा आहे. पूर्वी निरोप जायला वेळ लागायचा, दळणवळणाची साधने पुरेशी नसल्याने नातेवाईक यायलाही विलंब व्हायचा.
मात्र आता परिस्थिती बदलली आहे. आताच्या काळाशी तर्कसंगत निर्णय घेताना बदलाची सुरुवात स्वत:पासून करण्याचा संदेश समाजापुढे द्यायचा होता म्हणूनच आईच्या निधनानंतर १४ दिवसांचा दुखवटा न पाळता या काळातील विधी तीन दिवसांत केले, असे टोपे यांनी सांगितले. जुन्या परंपरा ह्या आताच्या काळाशी सुसंगत असाव्यात, समाजाचे नेतृत्व करणाऱ्यांनी बदलाचा पायंडा घालून दिला तर समाजप्रबोधनाला दिशा मिळते, असेही टोपे यांनी सांगितले.
