जनतेज न्युज

आघाडीचेच आमदार भाजपात आणणार, चंद्रकांत पाटील यांचा दावा

प्रतिनिधी , पुणे : निवडणुकीआधी भाजपमध्ये (BJP) गेलेले आमदार राष्ट्रवादीमध्ये परतण्यास उत्सुक असल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे. मात्र त्यांच्या हा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी धुडकावला आहे. आमचे कुणीही आमदार कुठेही जाणार नाही पण आम्हीच त्यांचे आणणार आहोत, अशा शब्दात चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांवर निशाणा साधला. पुण्यात (Pune) भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांची महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासोबत कोरोनाच्या (Corona) धर्तीवर बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

महाविकास आघाडी सरकार आमच्यासोबत दुजाभाव करत आहे. आमची छोटी छोटी कामे देखील केली जात नाही. त्यामुळे आपल्या मतदार संघातील प्रश्न घेऊन जर कुणी आमदार शरद पवार यांना भेटले असेल त्यात गैर काय आहे. परंतु, या भेटीनंतर ते आमदार थेट भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे वातावरण मुद्दामहून महाविकास आघाडीचे काही नेते निर्माण करत आहे. मात्र, भाजपचा एकही आमदार शरद पवार यांच्या संपर्कात नाही.असेही पाटील यांनी सांगितले.

पाटील म्हणाले की, साताऱ्यातील भेटीचे उदाहरण देऊन काही नेते भाजपाचे आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करण्यास उत्सुक आहेत असा दावा करत आहे. मात्र; काही कामानिमित्त सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांमध्ये वेळोवेळी भेटीगाठी घडत असतात. त्यामुळे आपल्या मतदारसंघातील समस्या घेऊन जर कुणी शरद पवारांना भेटले असेल तर त्याचा अर्थ ते त्यांच्या संपर्कात आहे असा होत नाही. मात्र, वेळप्रसंगी राजकारणात या प्रकारच्या चर्चा अनेकवेळा मुद्दामुहून घडवून आणल्या जातात. त्याच धर्तीवर महाविकास आघाडीतले नेते भाजप सोडून काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचे वातावरण निर्माण करत आहे. परंतु, भाजपचा कोणताही आमदार पवार यांच्या संपर्कात नाही. मात्र या भेटीचा राजकीय फायदा उचलत महाविकास आघाडी आणि शरद पवार हे आपल्या आमदारांना दिलासा आणि विश्वास देण्याचा प्रयत्न करत आहे. असेही पाटील म्हणाले.