प्रतिनिधी , मुंबई : ६० व्या ‘महाराष्ट्र दिना’च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी विविध मुद्द्यावर भाष्य करत ठाकरे सरकारसह विरोधी पक्षालाही लक्ष केले. विशेष म्हणजे कोरोनाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी पुन्हा एकदा परप्रांतीयांचा मुद्दा उपस्थित केला.
ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रावर संकट येईल तेंव्हा परप्रांतीय आपल्या राज्यात परत जातात, हे मी अनेक वेळा म्हटलं आहे. त्यामुळे आतातरी महाराष्ट्राने परप्रांतीयांवर अवलंबून राहणं थांबावं. उलट मराठवाड्यात किंवा इतर भागात असंख्य बेरोजगार तरुणांना कामाची गरज आहे त्यांना आता संधी देण्याची गरज आहे आणि माझी परप्रांतीयांना सांगणं आहे की, संकटकाळी महाराष्ट्र सोडून जाऊ नये, ज्या राज्याने तुम्हाला इतकं दिलं आता महाराष्ट्रावर संकट आलंय तेंव्हा महाराष्ट्राची साथ सोडून जाता कामा नये. महाराष्ट्रात मराठी बनून, इथली भाषा शिकून, इथल्या संस्कृतीशी जुळवून घेतलं तर आम्ही परप्रांतीयांना का विरोध करू? पण जर इथे तुम्ही दादागिरी करू लागलात तर आम्ही खपवून घेणार नाही. असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.
राज ठाकरे यांनी राज्यात मद्यविक्रीची दुकाने सुरु करावीत अशी मागणी केल्यानंतर शिवसेनेने सामना संपादकीयच्या माध्यमातून त्यांच्यावर टीका केली होती. या टीकेला राज ठाकरे यांनी शिवसेनेला जोरदार उत्तर दिले. काही जणांना वाटलं की मी तळीरामांची बाजू घेतली. यामध्ये तळीरामांचा काय संबंध येतो. प्रश्न असा आहे की तुमच्याकडे तात्काळ पैसे कुठून येणार आहेत. काय मार्ग आहेत तुमच्याकडे ? हाच मार्ग आहे दुसरा कोणताच पर्याय नाही. याऐवजी कारखाने उघडा सांगता. मग उघडा. मी काही दारुचे गुत्थे सुरु करा सांगितलं नाही. महाराष्ट्रात लोकांना तुम्ही परवाने दिले आहेत. महाराष्ट्रात लॉकडाउनच्या आधी दारुबंदी नव्हती. ही दुकानं सुरुच होती. हे खातं किती महत्त्वाची आहे ते संबंधितांना माहिती आहे. राज्याने या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. मी वाईन शॉप सुरु करा असं म्हणालो होतो तो महसुलाचा विचार करून, तळीरामांचा विचार करून बोललो नव्हतो. असा खुलासाही त्यांनी केला.
लॉकडाऊनचं लोकांनी जास्तीत जास्त पालन करायचा प्रयत्न केला पण जीवनावश्यक वस्तू लोकांना उपलब्ध करून देण्यात नियोजनाचा अभाव आहे हे नक्की. उदाहरणार्थ जर दोन तास तुम्ही दुकान उघडी ठेवली तर लोकं सामान खरेदी करायला गर्दी करणारच. आता ह्यापुढे लॉकडाऊनला लोकांचा कितपत प्रतिसाद मिळेल सांगता येत नाही, कारण लॉकडाऊनमुळे लोकांचा रोजगार ठप्प झालाय, अनेक लोकं भुकेने बेजार झाले आहेत, त्यामुळे लॉकडाऊन आता किती वाढवायचा ह्याचा विचार दिसत नाहीये, लॉकडाऊन कसा काढणार ह्याचा विचार दिसत नाहीये.
लॉकडाऊन लांबला म्हणून कोरोना नष्ट होईलच ह्याची खात्री नाही त्यामुळे लॉकडाऊनचा विचार करताना त्याचे होणारे आर्थिक, सामाजिक परिणाम मोठे आहेत त्याचा विचार करा. आज अपघातात वर्षाला लाख दीड लाख लोकं मृत्युमुखी पडतात, म्हणून आपण ट्रेन मध्ये किंवा कार मध्ये बसणं बंद करत नाहीत ना. आपण आता कोरोनाला स्वीकारून स्वतःची काळजी घ्यायला शिकलं पाहिजे. असा सल्लाही त्यांनी दिला.
कोरोनामुळे देशात १२ ते १५ कोटी नोकऱ्या जातील असा अंदाज आहे. राज्यात देखील अनेक लाख लोकांच्या नोकऱ्या जाऊ शकतील. आज राज्यापुढे मोठं आर्थिक संकट आहे. केंद्राने राज्यांना जीएसटीचे पैसे अजून दिले नाही. आज महाराष्ट्रातील नाट्यसृष्टी, चित्रपटसृष्टी, टीव्ही माध्यमं ह्यांचा विचार सरकार करणार का? असा प्रश्न उपस्थित करत महाराष्ट्रची प्रगती हेच महाराष्ट्रावरचं संकट ठरलंय. ५० वर्षांपूर्वी दक्षिणेतून मोठ्या प्रमाणावर लोकं महाराष्ट्रात यायचे पण दक्षिणेच्या राज्यांची प्रगती झाली आणि तिथून येणाऱ्यांची संख्या घटली. आज देशाचे सर्वाधिक पंतप्रधान उत्तरप्रदेशातून निवडून येतात पण त्या उत्तरप्रदेशाचा विकास नाही होत. असेही ते म्हणाले.
मऱ्हाठेशाहीने जवळपास १५० वर्ष देशावर राज्य केलं, अनेक विचारधारा मग ती कम्युनिझम ते आरएसएस पर्यंतच्या विचारधारांचा जन्म महाराष्ट्रात झाले, एका पेक्षा एक सरस नेते महाराष्ट्रातून दिल्लीत गेले, दिल्ली देखील महाराष्ट्राचं म्हणणं ऐकून घ्यायचो पण आजचे राजकारणी कणाहीन झालेत. महाराष्ट्राची सांस्कृतिक जडणघडण महाराष्ट्र विसरलाय, आपण आपल्या भाषेकडे पण चालढकलीच्या नजरेने बघतोय, आज महाराष्ट्र भांबावला आहे असं दिसतंय. आज राज्यकर्त्यांनीच गुडघे टेकलेत त्यामुळे लोकं कुठे आणि कोणाकडे बघणार? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
महाराष्ट्राकडे बघितलं तर ९५ च्या आधीचा महाराष्ट्र आणि ९५ च्या नंतरचा महाराष्ट्र अशी विभागणी करता येईल. बाळासाहेबांची झोपडपट्टीवासीयांना मोफत घरं देण्याची योजना चांगली होती पण मुंबईत फुकट घरं मिळत आहेत हे कळल्यावर लोंढे येऊ लागले आणि मराठी भाषेची आणि इथल्या सांस्कृतिक चौकटीची वीणच उसवली. झोपडपट्टी पुनर्वसन योजना ही सरकारने स्वतःकडे घ्यावी, बिल्डरांच्या हाती देऊ नये ही गोष्ट मी गेले अनेक वर्ष सांगतोय, ह्याचा पुनर्विचार व्हायला हवा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
महाराष्ट्राने सांस्कृतिक वारसा, छत्रपती शिवाजी महाराजांचा बाणेदारपणा गमावला. महाराष्ट्र जातीत अडकला, महापुरुष सुद्धा आपण जातीत अडकवून टाकले, ह्याच गोष्टींनी महाराष्ट्र संपणार. मराठी माणूस मराठी म्हणून एकत्र येऊ नये तो जातीत अडकवा म्हणून सगळे देशभरातील श्राद्धाचे कावळे टपून बसलेत. महाराष्ट्राने, इथल्या तरुण-तरुणींनी आपलं राज्य कसं मोठं होईल, करता येईल ह्याच स्वप्न बघावं लागेल. महाराष्ट्राची ताकद महाराष्ट्राने गमावता कामा नये. अटकेपार झेंडे फडकवले असं आपण म्हणतो पण तो महाराष्ट्र आज सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या गलितगात्र झालाय त्या महाराष्ट्राने आता ह्या लॉकडाऊनचा काळाचा वापर करून पुन्हा झेपावण्यासाठी विचार करायला हवा, असा सल्लाही त्यांनी दिला.
महाराष्ट्राने कायम राज्याचा विचार न करता देशाचा विचार केला हे चूक आहे का नाही माहित नाही पण आता राज्याने स्वतःचा विचार आधी करायला हवा. कोरोनाचं संकट अभूतपूर्व आहे हे मान्य त्यामुळे केंद्र, राज्य गोंधळलं होतं हे मान्य पण आता पुढचे निर्णय घेताना नोकरशाहीचा दबाव घेता कामा नये. तसंच हिंदूंनी जर सण घरात साजरे केले तर मग रमझानसाठी रस्त्यावर येण्याची सूट का दिली जाते? असा खरमरीत प्रश्न त्यांनी केंद्रासह राज्यब सरकारला केला.
आज महाराष्ट्र देश कोरोनाशी झुंजत असताना राज्यपाल जे काही राजकारण करत बसलेत ते चुकीचं आहे, राज्यपालांच्या आडून जे राजकारण करत असतील त्यांना पण हेच सांगणं आहे की हे चुकीच आहे. १८) महाराष्ट्राचं तेज पुन्हा येवो. महाराष्ट्र आजवर ज्या क्षेत्रात अग्रेसर होता त्या क्षेत्रात पुन्हा महाराष्ट्र अग्रेसर व्हावा आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राने देशाला विचार द्यावा. असे म्हणत त्यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
