प्रतिनिधी , सांगली : कुपवाड जकात नाका या मुख्य मार्गावरील दुतर्फा असणारी अतिक्रमणे काढण्याची मोहीम आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने सुरू झाली आहे. यामुळे लवकरच कुपवाडचा मुख्य रस्ता मोकळा श्वास घेणार आहे. आजपासून या मार्गावरील अतिक्रमणे हटविण्यास सुरवात झाली आहे.
सूतगिरणी ते कुपवाड एमआयडीसी मार्गावर दोन्ही बाजूला अतिक्रमने असल्याची तक्रार उद्योग मित्र बैठकीत करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी सदर मार्गवरील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश दिले होते. यानुसार आज सहायक आयुक्त दत्तात्रय गायकवाड, सहायक आयुक्त दिलीप घोरपडे आणि नगर रचना विभागाचे संजय कांबळे तसेच अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सकाळपासून अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली आहे. सूतगिरणी चौकातील टपऱ्या आणि वाढीव शेड हटवून कुपवाडकडे जाणाऱ्या मार्गालगत असणारे अतिक्रमण हटविण्याचे काम सुरू झाले आहे. या कामगिरीत स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील, सिद्धांत ठोकळे, अतुल आठवले , विकास कांबळे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पीएसआय राजू अन्नछत्रे, बापू कांबळे तसेच मनपा अतिक्रमण विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते.
