जनतेज न्युज

उदघाटन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते

प्रतिनिधी , कोल्हापुर : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात जास्त पटसंख्या असलेल्या व राज्यातील सर्वाधिक पटसंख्या असलेल्या मोठ्या डिजिटल शाळेची उभारणी करवीर तालुक्यातील कणेरीवाडीच्या विद्यामंदिर ने केली आहे. शनिवारी (आज दि.१६) या शाळेचे उदघाटन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते व पालकमंत्री सतेज यांच्या उपस्थित होणार आहे.

१९३० च्या दशकात देशात एका बाजूला स्वातंत्र्याचा लढा सुरू असतानाच दुसरीकडे कणेरीवाडी येथे शिक्षणाची ज्ञातज्योत पेटवण्याचे काम स्वातंत्र्यसैनिक तुकाराम रावजी मोरे गुरुजींनी केले. ९० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या शाळेने ही ज्ञानज्योत आजही धगधगत ठेवली आहे. आज जिल्ह्यात सर्वाधिक पट असलेली शाळा म्हणून ओळख बनली आहे. याहून अभिमानास्पद गोष्ट म्हणजे राज्यातील सर्वात मोठी असलेली पहिली डिजिटल शाळा म्हणून नावारूपाला आली आहे. अंतर्बाह्य नीटनेटकी शाळा, प्रशस्त व स्वच्छ मैदान असलेली शाळा, सर्व २४ वर्ग खोल्या डिजिटल असलेली शाळा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुणवत्तेतही सर्वोत्कृष्ट असणाऱ्या या शाळेलाही ग्रामस्थांनीही डिजिटल शाळा बनवण्यासाठी भरभरून मदत दिली. यातूनच शाळेचा कायापालट झाला.

१५०० कुटुंबाची प्रत्येकी ५०० रुपये मदत

हा मनोदय पूर्ण करण्यासाठी कणेरीवाडी ग्रामस्थांनी अथक प्रयत्न सुरू ठेवले होते. लॉकडाऊन काळात देखील घरटी ५०० व त्यापेक्षा अधिक लोकवर्गणी गोळा केली. एक, दोन नव्हे तर जवळपास १५०० कुटुंबांनी मदत केली आहे, तर शिक्षकांनीही दीड लाखाची मदत केली.

मुख्याध्यापक राहुल ढाकणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कुमार मोरे, उपाध्यक्ष रवींद्र खोत, सरपंच शोभा खोत, उपसरपंच अजित मोरे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने केलेले प्रयत्न व याला पाठिंबा देणारे जि. प.चे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांच्यामुळे कणेरीच्या शाळेचा कायापालट झाला. खोत यांनी माजी विद्यार्थी, जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन मंडळ , सीएसआर निधी, या सर्वातून शाळेचा विकास करण्याचा एक ध्यास घेतला होता. त्या माध्यमातून जवळपास ३५ लाखांचा निधी उभा केला. शासकीय निधीसह स्वत: पाच लाखांची वर्गणी देत संकल्प पूर्ण केला आहे