प्रतिनिधी , पुणे : लॉकडाउन सुरु असतानाही वाधवान कुटुंबियांना महाबळेश्वरला जाण्यासाठी विशेष परवानगी कशी मिळाली यावरुन राज्यात बराच वाद निर्माण झाला होता. यावर तात्काळ पावलं उचलत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुप्ता यांच्या चौकशीचे आदेश दिले. मात्र याच घटनेवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
न्यूझीलंडमध्ये लॉकडाउनचा नियम मोडणाऱ्या आरोग्य मंत्र्यांचं तिकडच्या राष्ट्राध्यक्षांनी पद काढून घेतलं. उद्धवजी आम्ही तुमच्यासोबत आहोत, मात्र आपण अमिताभ गुप्ता यांच्यावर कठोर कारवाईचे संकेत दिले असते तर तुमचा कणखरपणा दिसला असता, अशा शब्दांत राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
तसेच कोरोना विषाणूच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पोलिस आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण जाहीर केलं आहे. त्यानुसार शेतकरी आणि शेतमजूरांना विमा संरक्षण द्यावं, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे लॉकडाऊनमुळे शेतातील सडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळेया मालाचा तात्काळ पंचनामा करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा कोरोनामुळे जेवढे बळी गेले नाही. त्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील, याचं सरकारने भान ठेवावं, असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे
राजू शेट्टी म्हणाले की, लॉकडाऊन काळामध्ये र्सव्ह लोक घरातच थांबून आहेत. मात्र अशाही परिस्थितीत शेतकरी आपल्या जीवाची पर्वा न करता शेतात राबतोय. शेतकरी सुरक्षेचं कोणतंही कवच नसताना जनतेच्या अन्नधान्यासाठी भाजीपाल्यासाठी दिवसरात्र शेतात काम करत आहे. त्यामुळे शेतकरी आणि शेतमजुरांना विमा संरक्षण देणं अत्यावश्यक आहे. लॉकडाऊन काळात शेतीला मोठा फटका बसला आहे. फळबागा, भाजीपाला सडू लागला असून रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने त्वरित शेतमालाचा पंचनामा करावा आणि नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी त्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली तरच तो पुन्हा उभा राहील. अन्यथा कोरोनामुळे जेवढे बळी गेले नाहीत तेवढे शेतमाल न विकल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतील. त्यामुळे सरकारनं या गोष्टीचं भान ठेवावं आणि तात्काळ शेतकऱ्यांना विमा संरक्षण आणि नुकसान भरपाई द्यावी. राज्यात सध्या हरभरा, गहू, तुरीची काढणी सुरु आहे. मात्र व्यापारी शेतकऱ्यांकडून हा माल हमीभावाने खरेदी करण्यास तयार नाही. ग्राहकांना ११० रुपये किलो दराने तूर घ्यावी लागत आहे. मात्र तीच तूर व्यापारी शेतकऱ्यांकडून ४० रुपये प्रतिकिलोने विकत घेत असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला.
