जनतेज न्युज

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता मात्र दिवसाला 900 रुग्ण सापडले तरी महापालिका सज्ज – डॉ. विजय सूर्यवंशी

नागरिकांनी आणखी जास्त काळजी घेण्याचेही आवाहन
प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली :दिवाळीनंतर कल्याण डोंबिवलीतील कोरोना रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ दिसून येत असून
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता शासकीय यंत्रणांकडून वर्तवण्यात येत आहे . दिवसाला 900 रुग्ण आढळले तरी केडीएमसी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वास महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केला आहे.
दिवाळीपूर्वी केडीएमसी क्षेत्रातील कोरोनाचे आकडे 60 च्या खाली गेले होते. मात्र गेल्या 2-3 दिवसांपासून ते पुन्हा 150 च्या वर जाताना दिसत आहेत. मात्र महापालिकेने बनवलेल्या जम्बो फॅसिलिटीनूसार दरदिवशी 900 पेशंट आढळले तरी आपण उपचार करण्यासाठी सज्ज असल्याचे डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. तर केडीएमसीने आतापर्यंत 2 लाख 40 हजार लोकांच्या अँटिजेन आणि कोवीड टेस्ट केल्या आहेत. कल्याण डोंबिवली क्षेत्रात 22 ठिकाणी कायमस्वरूपी टेस्टींग सेंटर सुरू करण्यात आले असून येत्या दोन तीन दिवसांत आणखी 15 सेंटरची वाढ केली जाणार आहे. अँटीजेन टेस्ट निगेटिव्ह येणाऱ्यांचीही लगेच आरटीपीसीआर (कोवीड टेस्ट) केली जाणार असल्याचे डॉ. सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.
या व्यतिरिक्त कल्याण आणि डोंबिवली स्टेशनवर बाहेरगावाहून आलेल्या 3 हजार 500 प्रवाशांच्या अँटिजेन टेस्टमध्ये 37 जण पॉजीटीव्ह आढळून आले आहेत. येत्या काळात ज्या ज्या ठिकाणी टेस्टींग वाढवण्याची आवश्यकता असेल त्याठिकाणी टेस्टींग वाढवण्यात येईल अशी माहितीही पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.