प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : गेल्या दोन दिवसापासून कल्याण-डोंबिवलीत कोविड रुग्णांची संख्या १०० च्या वर आहे. आतापर्यंत जवळपास ६२ हजार रुग्ण आढळून आले असून त्यापैकी ११५२ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आता परत कोरोना डोकं वर काढताना दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कंबर कसली आहे. नागरिक आणि दुकानदार नियमांचे पालन करत आहे की नाही. हे पाहण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी हे स्वत: अॅक्शन मोड मध्ये पाहण्यास मिळाले आहेत. आयुक्तांनी रस्त्यावर उतरत दुकानात जाऊन, नागरिकांशी संवाद साधुन परिस्थितीचा आढावा घेतला. यात अजूनही काही दुकानदार मास्क वापरत नाही हे त्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्याचे त्यांनी आदेश दिले आहेत.
या पुढेही अशी कारवाई होत राहणार असून विशेषता लग्नाचे मंगल कार्यालय, मॉल्स, लग्न समारंभ, इतर कार्यक्रमांमध्ये गर्दी होऊ नये यासाठी महानगरपालिकेची विशेष पथके लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनीही नियमांचे पालन करावे, नागरिकांनी शिस्त पाळली तर लॉक डाउन लावण्याची गरज भासणार नाही. असेही आयुक्तांनी सांगितले.
