प्रतिनिधी , पुणे : बारामतीत कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यानंतर पवारांनी क्विक ऍक्शन घेऊन तेथे भिलवाडा पॅटर्न राबवला व बारामतीत कोरोनाला हात पाय पसरवण्य़ापासून रोखले. त्यानंतर आता पवारांनी पुण्याची खबरदारी घेत तेथेही कोरोना प्रतिबंधक उपाययोजना अधिक प्रभावी करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पुण्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चार वरीष्ठ अधिका-यांची नेमणूक केली आहे.
अजित पवार यांच्या निर्देशानुसार अनिल कवडे, सौरभ राव, सचिंद्र प्रतापसिंग आणि कौस्तुभ दिवेगावकर या चार वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची पुणे शहरासाठी विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे विभागीय आयुक्त आणि पुणे महापालिका आयुक्तांना कोरोनाविरुद्धच्या लढाईत हे अधिकारी सहाय्य करतील.
राज्याच्या मुख्य सचिव कार्यालयातर्फे आज यासंबंधीचे आदेश जारी करण्यात आले. अनिल कवडे हे राज्याचे सहकार आयुक्त आहेत. सौरभ राव यांच्याकडे साखर आयुक्तपदाची जबाबदारी आहे. सचिंद्र प्रतापसिंग यांच्याकडे पशुसंवर्धन आयुक्त तर, कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे भूजल सर्व्हेक्षण संचालकपदाचा कार्यभार आहे. हे चारही अधिकारी मूळ जबाबदारी सांभाळून पुणे महापालिका क्षेत्रातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांवरही काम करणार आहेत.
या अधिका-यांच्या नियुक्तीमुळे पुणे येथे कोरोनाला रोखण्यासाठी मदत होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
लोकमतने हे वृत्त दिले आहे.
