प्रतिनिधी, कोल्हापूर : होय आम्ही हिंदू आहोत अशा घोषणेच्या टोप्या घालून शिवसेनेचे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हिंदुत्वाच्या मुद्द्याला आव्हान देत कोल्हापूरच्या शिवसैनिकांनी आज कोल्हापुरात शिवसेनाप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना समर्थन दर्शवण्यासाठी संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली शक्तिप्रदर्शन केले. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या बंडखोर आमदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
गेल्या चार दिवसापासून महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख पक्ष असणाऱ्या शिवसेनेत बंडखोरीचे नाट्य सुरू आहे. शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाविरोधात बंड पुकारले आहे. त्यांच्या या बंडात शिवसेनेचे बहुसंख्य आमदार देखील सामील झाले आहेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच शिवसेना पक्षाचे चिन्ह देखील या बंडखोर गटाला मिळण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असणारे महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत आले आहे. या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरातील शिवसैनिकांनी खास त्यांच्या स्टाईलमध्ये संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी करून उद्धव ठाकरे यांना समर्थन दर्शवण्यासाठी शक्तिप्रदर्शन केले. या शक्ती प्रदर्शनातील सर्वात खास बाब होती ती म्हणजे कोल्हापूरच्या शिवसैनिकांनी होय आम्ही हिंदू आहोत हे घोषवाक्य असणाऱ्या टोप्या.. बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांचे हिंदुत्व हे आमचे हिंदुत्व आहे ते टिकवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर सत्तेतून बाहेर पडावे असा सूर धरला आहे. त्यांच्या या हिंदुत्वाला आव्हान देण्यासाठी शिवसैनिकांनी या घोषवाक्याच्या टोप्या परिधान केल्या असल्याचे दिसून आले.कोल्हापुरातील शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर आणि चंद्रदीप नरके या दोघांची अनुपस्थिती प्रामुख्याने जाणवत होती. आजच माजी आमदार राजेश क्षीरसागर हे गुहाटी येथे जाऊन मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर गटात सामील झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या अनुपस्थितीचे कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे. माजी आमदार राजेश क्षीरसागर चंद्रदीप नरके सत्यजित पाटील डॉक्टर सुजित मिणचेकर आणि उल्हास पाटील हे कोल्हापूर जिल्ह्यातील पाच माजी आमदार गेल्या काही दिवसांपासून नॉटरिचेबल होते. याबद्दल कोल्हापूर जिल्ह्यात तर्कवितर्क लढवले जात होते मात्र आजच्या या शक्ती प्रदर्शनात सत्यजित पाटील, डॉक्टर सुजित मिणचेकर, आणि उल्हास पाटील हे तिघेही सक्रीय होते. या तिघांनीही आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बरोबर असल्याचे शिवसैनिकांसमोर स्पष्ट केले. या शक्तिप्रदर्शन यावेळी खासदार संजय मंडलिक, जिल्हाप्रमुख संजय पवार, मुरलीधर जाधव विजय देवणे आणि हजारो शिवसैनिक उपस्थित होते .
