प्रतिनिधी , कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील वाहतुकीला अडथळा होऊ नये, यासाठी रस्त्याकडेला पार्क केलेली वाहने आणि बेवारस वाहनांवर पोलिसांसह महानगरपालिकेने कारवाई केली होती. या कारवाईनंतरही शहरात बेशिस्त पार्किंगचा प्रश्न कायम आहे. तर कोरोणामुळे थंडावलेल्या कारवाईला पुन्हा एकदा बूस्टर देण्याची गरज आहे. रस्त्याकडेला पार्क केलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीसह अपघातांचा धोकाही वाढला आहे.
वाहतूक कोंडी झाली नित्याचीच
अपुऱ्या जागेमुळे अनेक व्यावसायिकांनी रस्त्यावर दुकाने थाटली आहे. काहींकडून अर्ध्या रस्त्याचा बिनदिक्कत वापर केला जातो. पार्वती टॉकीज, शाहूपुरी, महाद्वार रोड, ताराबाई रोड, पापाची तिकटी, बागल चौक, यासह अन्य चौकात वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे.
फुटपाथ उरले नावालाच…
शहरातील बहुतांश फुटपाथ हे विक्रेत्यांनी व्यापले आहेत. अनेक ठिकाणी फुटपाथवरच वाहने उभी केल्याचे दिसून येते. काही भागांत तर च्क्क रस्त्यावर वाहने उभी करण्यात येत असल्याचे दिसून येते. तर कोरोनामुळे अनेकांनी नवीन व्यवसाय फुटपाथवर मांडले आहेत.
बेशिस्त असो वा अतिक्रमण असो त्याला कोण पाठीशी घालत असेल, त्यावर देखील कारवाई केली जाईल. सर्वांना नियम सारखेच आहेत. वाहतुकीचे नियम सर्वांना समानच आहेत. या नियमांचे उल्लंघन आल्यास योग्य ते कारवाई केली जाईल. तसेच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कोल्हापूर पोलीस, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरटीओ विभाग प्रयत्न शील आहे, अशी प्रतिक्रिया पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.
