प्रतिनिधी , धुळे : धुळे जिल्ह्यातील खान्देश शाहीर कलावंत वारकरी मंडळ संघटनेच्या वतीने धुळे शहरातून वारकरी बांधवांसह कीर्तन करीत मृदुंग टाळांसह रॅली काढत आज धुळे जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन केले. शासनाच्या दुर्लक्षामुळे कलावंतांच्या कलेचा शासन दरबारी नामउल्लेख होत नाही. शासनाने वृध्दापकाळामध्ये अडीअडचणी दूर कराव्यात तसेच शासकीय कार्यालयात चांगली वागणूक मिळावी. अशा विविध मागण्या घेऊन आज कलावंतांनी जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालया बाहेरच ठिय्या आंदोलन केले.
ऑक्टोबर २०२० ते जानेवारी २०२१ पर्यंतचे ४ महिन्याचे मानधन कलावंतांच्या खात्यावर त्वरीत टाका, वृध्द कलावंतांच्या मानधनासाठी जिल्हास्तरीय निवड समिती गठीत करा, मानधन प्रस्तावाची त्वरीत छाननी करुन तात्काळ मंजुर करा., मानधनाची रक्कम दर महिन्याच्या ५ तारखेच्या आत बँक खात्यावर जमा करा., दरमहा पाच हजार मानधन द्या, प्रतीवर्षी कलावंतांचे ३०० प्रस्ताव मंजूर व्हावेत, वृध्द कलावंतांच्या मुलांना शिक्षणात १००% फी माफ झाली पाहिजे, आजारी वृध्द कलावंतांना मोफत शासकिय वैद्यकिय सेवा मिळाली पाहिजे अश्या विविध मागण्या यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितल्या. तसेच येणाऱ्या काळात आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर यापेक्षा ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
