प्रतिनिधी , यवतमाळ : धनगर समाज गुरे चारण्याचा प्रमुख व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गायरान व वनविभागाच्या जमिनीवर गुरे चराईसाठी त्यांना विरोध केला जातो. त्यामुळे गुरे चराईसाठी गायरान, वनविभागाची जमिन देण्यात यावी, या मागणीसाठी धनगर समाज युवा मल्हार सेनेने जिल्हाधिकारी कार्यालयात शेकडोंच्या उपस्थितीत धडक दिली. चारा मिळत नसल्याने जनावरांना घेऊन दूरवर भटकंती करावी लागते. चार्याअभावी मुक्या जनावरांचा जाणारा जीव बघून मानवी मनाला वेदना होतात. यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शेळ्या, मेंढ्या, गुरे चराईसाठी जमिन देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाला अलटीमेटम दिला आहे. मागणीकडे दुर्लक्ष केल्यास जिल्ह्याच्या चारही भागात लाखो मेंढरासह आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
