पुणे : राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून, सर्वांत जास्त रुग्ण पुण्यातून समोर येत आहेत. प्रशासनाकडून रुग्णांच्या वाढत असलेल्या संख्येला लगाम घालण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न सुरू आहे. मात्र रुग्ण आणि मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने पुण्यातील ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची तडकाफडकी बदली केली.
मात्र त्यांची बदली केल्यानंतर आता राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. रुग्णालयातील अनेकांना धक्का बसला. या बदलीविरोधात डॉक्टर, कर्मचारी यांनी काळ्या फिती लावून शासनाचा निषेध केला. ही बदली रद्द करण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली. मात्र या संपूर्ण प्रकरणाला राजकीय वळण असल्याचं समोर येत आहे.
मनसेचे पुणे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून हे सरकारसुद्धा चांगल्या अधिकाऱ्यांचा राजकीय बळी घेणार का? असा सवाल उपस्थित केला आहे. शिंदे यांनी फेसबुकवर स्वतःचा व्हिडीओ शेअर करून ठाकरे सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे.
