जनतेज न्युज

जाणून घेऊया ! गृह विलगीकरण व या कक्षासाठीच्या मार्गदर्शक सूचना

कोरोना विषाणुचे संशयीत रुग्ण परदेश दौऱ्यावरून तसेच इतर बाहेरील बाधित जिल्ह्यामधून आले आहेत. अशा रुग्णांना होम कॉरेन्टाईन (गृह विलगीकरण) करण्यात आले आहे. विलगीकरण कक्ष स्थापन करणे व त्यामध्ये १४ दिवसांसाठी सूचनांचे पालन आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ अन्वये पालन करणे या आदेशान्वये अनिवार्य करण्यात येत आहे.

कोरोना विषाणूचा शरीरात प्रवेश झाल्यानंतर त्याची लक्षणे दिसण्याचा कालावधी हा २ ते १४ दिवसांचा आहे. काहींमध्ये ही लक्षणे लवकर दिसतात तर काहींमध्ये अगदी १४ व्या, पंधराव्या दिवशी दिसायला लागतात. त्यामुळे अशा व्यक्तींना इतरांपासून आणि कुटुंबीयांपासून १४ दिवस दूर ठेवणे आवश्यक असते. जेणेकरून यांना लक्षणे आढळलीच तर ते इतरांच्या संपर्कात येऊन त्यांना बाधित करणार नाहीत. त्यासाठी त्यांनी १४ दिवसांसाठी गृह विलगीकरणात राहणे आवश्यक आहे. त्यांचा संपर्क कुटूंबियासोबतच इतरांशी होऊ नये यासाठी आरोग्य विभागाने गृह विलगीकरणातील व्यक्ती, आणि कुटुबियांसाठी काही मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत.

बघूया घरातील विलगीकरण कक्षाच्या मार्गदर्शक सूचना :

प्रवासाशी संबधित असलेली किंवा नसलेली नोव्हेल कोरोना विषाणू (कोविड-१९) चा संशयित रूग्ण सापडल्यानंतर त्याचे नियुक्त केलेल्या आरोग्य केंद्रामध्ये विलगीकरण करण्यात यावे. रुग्णाच्या सर्व निकट सहवासितांची लाईन लिस्ट बनवण्यात यावी. घराच्या स्तरावरील विलगीकरण संशयित किंवा दूषित रुग्णाच्या सहवासात आलेल्या सर्व सहवासितांना लागु होईल.
ही उपाययोजना भारतामध्ये सुरुवातीच्या टप्प्यात म्हणजेच प्रवासाशी संबंधित रुग्ण, प्रवासाशी संबंधित अथवा संबंध नसलेल्या रुग्णापासून तयार झालेला समुह जेथे क्लस्टर कंटेनमेंट धारण लागु आहे, कोविड-१९ प्रभावित भाग जेथे स्थानिक आणि समुदायामध्ये रोगाचा प्रसार होत आहे. यावेळी लागू होईल.

संपर्काची व्याख्या :

संपर्काची व्याख्या म्हणजे असा निरोगी व्यक्ती जो जंतुसंसर्ग व्यक्तीच्या किंवा दूषित वातावरणाच्या संपर्कात येतो आणि त्यामुळे त्याला जंतुसंसर्गाचा धोका अधिक वाढतो.

कोविड-१९ च्या संदर्भामध्ये सहवासित म्हणजे :

कोविड-१९ ग्रस्त रुग्णाच्या बरोबर एकाच घरात राहणारी व्यक्ती, कोविड-१९ ग्रस्त असलेल्या रुग्णाच्या संसर्गजन्य शारीरिक स्त्रावांशी कोणतेही वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे (पीपीई) न वापरता संपर्कात आलेली व्यक्ती, कोविड-१९ ग्रस्त रुग्णाशी बंदिस्त वातावरणात संपर्कात आलेली व्यक्ती, समोरासमोर संपर्कात आलेला व्यक्ती, १ मी. अंतरामध्ये संपर्कात आलेला व्यक्ती (विमानप्रवासात देखील समावेश) या सहवासितांचा समावेश होतो.

घरात विलगीकरण कक्ष करण्याची सूचना :

घरात विलगीकरण केलेल्या व्यक्तीने हवेशीर आणि वेगळी खोली ज्याला संडासबाथरूम जोडलेले आहे अशा खोलीमध्ये रहावे. जवळचे नातेवाईक जर त्या खोलीमध्ये राहणार असेल तर त्यांनी रुग्णापासून कमीत कमी १ मी. अंतरावर रहावे. अशा व्यक्तीने घरातील वृद्ध, गर्भवती स्त्री, लहान मुले व प्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात येऊ नये, अशा व्यक्तीने घरातील त्यांचा वावर मर्यादित ठेवावा, अशा व्यक्तीने कोणत्याही परिस्थितीत सामाजिक किंवा धार्मिक कार्यक्रम जसे की लग्न, अंत्यसंस्कार इत्यादी ठिकाणी जाणे कटाक्षाने टाळावे.

आरोग्याच्या दृष्टीने खालील सूचना पाळाव्यात :

अशा व्यक्तीने अल्कोहल युक्त हँड सॅनिटायझर किंवा साबण आणि पाण्याणे वारंवार व्यवस्थित हात धुवावेत. अशा व्यक्तीने वापरलेले ताट, वापरलेले पाण्याचे ग्लास, कप, जेवणाची भांडी, टॉवेल, पांघरूण, गादी आणि इतर दैनंदिन वापरातील घरगुती वस्तु घरातील इतर व्यक्तींना वापरण्यास देऊ नये, अशा व्यक्तींनी पूर्ण वेळ सर्जिकल मास्कचा वापर करावा. मास्क दर ६ ते ८ तासांनी बदलावा आणि वापरलेल्या मास्कची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. डिस्पोजेबल मास्क पुन्हा वापरू नयेत. अशा व्यक्ती, त्यांची शुश्रृषा करणाऱ्या व्यक्तीने, निकट सहवासितांनी घरातील सुश्रृषेदरम्यान वापरलेले मास्क ५ टक्के ब्लिच सोल्युशेन किंवा १ टक्के सोडियम हायपोक्लोराईट द्रावणामध्ये निर्जंतूक करून त्याची जाळून विल्हेवाट लावण्यात यावी. वापरलेले मास्क हा जंतू संसर्गयुक्त समजावा. अशा व्यक्तींना जर खोकला, ताप, श्वसनाचा त्रास,धाप लागणे अशी लक्षणे आढळल्यास जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर ०७१७२-२७०६६९, जिल्हा परिषद, चंद्रपूर ०७१७२-२५३२७५, २६१२२६, महानगरपालिका, चंद्रपूर ०७१७२-२५४६१४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

घरी विलगीकरण केलेल्या कोरोना ग्रस्त रुग्णाच्या नातेवाईकांसाठी सूचना :

शक्यतो एकाच नातेवाईकाने अशा व्यक्तीची सुश्रृषा करावी, अशा व्यक्तींच्या शरीराशी थेट संपर्क येणे टाळावे आणि त्यांचे वापरलेले कपडे झटकु नये. घरातील विलगीकरण कक्षाची स्वच्छता करताना किंवा अशा व्यक्तींचे वापरलेले कपडे हातळताना डिस्पोजेबल ग्लोव्हजचा वापर करावा. डिस्पोजेबल ग्लोव्हज काढल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत, नातेवाईक आणि अभ्यागतांना अशा व्यक्तींना भेटू देऊ नये. घरातील विलगीकरण कक्षामध्ये ठेवलेल्या व्यक्तींना जर कोविड-१९ लक्षणे आढळुन आली तर त्यांच्या निकट संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींना १४ दिवस घरातील विलगीकरण कक्षात ठेवावे व पुढील १४ दिवस किंवा अशा व्यक्तीचा प्रयोगशाळा रिपोर्ट निगेटिव्ह येईपर्यंत त्याचा पाठपुरावा करावा.

घराच्या स्तरावरील विलगीकरण कक्षाची स्वच्छता :

घरात केलेल्या विलगीकरण कक्षातील असलेल्या व्यक्तीच्या खोलीमधील वारंवार हाताळल्या जाणाऱ्या वस्तुंचे (फर्नीचर, बेड फ्रेम, टेबल) १ टक्के सोडियम हायपोक्लोराईट द्रावणाने निर्जंतुकीकरण करावे. शौचालयाची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण घरगुती ब्लिच किंवा घरगुती फिनायलने करावी. अशा व्यक्तींच्या संपर्कात आलेले कपडे अंथरूण, पांघरूण हे घरातील डिटर्जंट वापरून वेगळे स्वच्छ धुऊन वाळवावे.

घराच्या स्तरावर विलगीकरणाचा कालावधी :

कोविड-१९ ग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींसाठी घराच्या स्तरावरील विलगीकरणाचा कालावधी १४ दिवस असेल किंवा संशयित रुग्णाचे (जो की इंडेक्स केसच्या संपर्कात आलेला आहे) लॅब रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास हा कालावधी कमी असेल. अशा पद्धतीच्या घरातील विलगीकरण कक्षाच्या मार्गदर्शक सूचना पार पाडल्या तर कोरोना विषाणूपासून आपला बचाव नक्कीच करू शकतो.

प्रवीण टाके
जिल्हा माहिती अधिकारी, चंद्रपूर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.