जनतेज न्युज

टोकण पद्धतीने सोयाबीन पेरा अन् आर्थिक फायदा वाढवा

प्रतिनिधी, बुलडाणा :  गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात टोकण पद्धतीने सोयाबीनची लागवड केली जात आहे. त्याचा फायदा काय होतो, हे गेल्या वर्षी निदर्शनास आलेले आहे. पावसाने सोयाबीनचे नुकसान झाले, पण ज्या शेतकऱ्यांनी टोकण पद्धतीने सोयाबीनची लागवड केली आहे. त्यांचे नुकसान तर झाले नाहीच, उलट उत्पादनात वाढ झालेली आहे. यामुळे टोकण पद्धतीने सोयाबीन पेरा अन् आर्थिक फायदा वाढवा असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.: खरिपातील मुख्य पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. गेल्या चार वर्षांपासून या पिकाला चांगला दर मिळत असल्याने क्षेत्रही वाढत आहे. खामगांव तालुक्यात गतवर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे न भरून निघणारे नुकसान झालेले आहे. काही शेतकरी बैलजोडीच्या मदतीने सोयाबीनची पेरणी करत आहेत. काही शेतकरी लागवडीसाठी ट्रॅक्टरचलित सात दात्यांचे पेरणी यंत्र वापरतात. यात मनुष्यबळाचा खर्च कमी येतो, पण उत्पादनात फारशी वाढ होत नाही.

शेतकऱ्यांनी टोकण पद्धतीनुसार सोयाबीन लागवड केली तर त्यांच्या उत्पादनात वाढ झालेली आहे. टोकण पद्धतीमुळे २० किलोच्या बियाण्यांमध्ये शेतकऱ्यांना क्विंटलचा उतारा २२ मिळाल्याचे उदाहरण समोर आलेले आहे.

टोकण पद्धत म्हणजे ज्याप्रमाणे हळदीची किंवा उसाची सरी काढून लागवड केली जाते, तीच पद्धत सोयाबीनसाठी राबवायची आहे. यामध्ये साडेतीन फूट सरी काढून रोगराईचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बेड तयार करावेत. सरीच्या दोन्ही बाजूस ९ इंचाच्या अंतरावर सोयाबीनची लागवड केल्यास त्याचा फायदा होणार आहे.