जनतेज न्युज

ठाण्यातील बाळकूम भागात लवकरच उभारण्यात येणार मैदान.

प्रतिनिधि , ठाणे : ठाण्यातील बाळकुम परिसरातील नगरसेवक तथा ठाणे महापालिकेचे स्थायी समिती सभापती संजय भोईर यांच्यावतीने बाळकूम भागात नव्याने उभारण्यात आलेल्या मैदानाच्या जागेची पाहणी करण्यासाठी नुकतेच एका दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर, नगरसेविका उषा भोईर आदी उपास्थित होते. स्मार्ट सिटी अंतर्गत बाळकुम परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. स्थानिक नागरिकांच्या मागणीवरून तसेच कल्पतरू विकासकाच्या माध्यमातून याठिकाणी खेळाचे मैदान तयार करण्यात येणार आहे. गावातील मुलांना खेळण्यासाठी हक्काचे असे मैदान नसल्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणावर कुचंबणा होत असते. यासाठी बाळकुमवासियांसाठी मैदान खुले करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या मैदानामध्ये खो-खो, कब्बडी,क्रिकेट, मल्लखांब आदी खेळ खेळले जातील, असा विश्वास सभापती संजय भोईर यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर मेट्रो कामाच्या बाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. मेट्रोच्या संथगतीने चालणाऱ्या कामामुळे बाळकुम नाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होऊन त्याचा नाहक त्रास स्थानिक नागरिकांना सहन करावा लागतो.या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी संबधीत अधिकाऱ्यांचा पाहणी दौरा आयोजित केल्याचे संजय भोईर यांनी सांगितले.