मागण्या मान्य न झाल्यास ताला ठोको आंदोलनाचा इशारा
प्रतिनिधी ,प्रशासनातर्फे मेंढपाळ व ठेलारी बांधवांना वनचराई जमिनी मेंढ्या चारण्यासाठी आरक्षित करून दिले आहेत. परंतु वन विभागाच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आर्थिक लोभापाई ठेलारी बांधवांना त्यांच्या हक्काची वनचराई जमिनीपासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप महाराष्ट्र ठेलारी महासंघतर्फे करण्यात आला आहे.
ठेलारी समाजाच्या अनेक मागण्यांसाठी गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्र ठेलारी संघटना लढा देत आहेत. गेल्या 15 दिवसांपूर्वी याबाबत वनविभागाच्या कार्यालयाबाहेर प्रशासनाच्या व अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्र ठेलारी महासंघातर्फे मुंडन आंदोलन केले होते. तसेच गेल्या दोन वर्षांपासून विविध प्रकारे प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न या संघटनेतर्फे करण्यात आला आहे. परंतु गेल्या दोन वर्षांपासून वन विभागातर्फे चालढकलपणा सुरू असल्यामुळे महाराष्ट्र ठेलारी महासंघ तर्फे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पुढील पंधरा दिवसांत सकारात्मक भूमिका न घेतली गेल्यास कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
