जनतेज न्युज

डोंबिवलीतील सुतिकागृहाच्या जागी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि मॅटर्निटी होम – डॉ. श्रीकांत शिंदे

प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : डोंबिवलीत बंद अवस्थेत असणाऱ्या सुतिकागृहाच्या जागी मल्टी स्पेशालिटी रुग्णालय आणि मॅटर्निटी होम पीपीपी तत्त्वावर विकसित करण्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. यामुळे नागरिकांना अत्यल्प दरात दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणार असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.
व्हीओ : डोंबिवली पूर्व येथील सुतिकागृह गेली अनेक वर्षे बंद अवस्थेत आहे. येथील इमारतही धोकादायक बनल्यामुळे या रुग्णालयाचा पुनर्विकास करावा, यासाठी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सातत्याने यासंदर्भात पत्रव्यवहार करून आणि अनेक बैठका घेऊन या पुनर्विकासाचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला. पालकमंत्री एकनाथ शिंदे, तत्कालीन, विद्यमान आयुक्त, तसेच महापौर यांच्या पातळीवर केलेल्या पाठपुराव्यानंतर महापालिकेने पीपीपी तत्त्वावर पुनर्विकासाचा निर्णय घेतला. त्यानुसार नवीन रुग्णालयाच्या सविस्तर प्रकल्प अहवालावर सर्वसाधारण सभेने मंजुरीची मोहोर उमटवल्याने आता पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
असे असणार नविन रुग्णालय आणि मॅटर्निटी होम…
जुन्या रुग्णालयाच्या जागी दोन नव्या इमारती उभ्या राहणार असून एका इमारतीत अद्यायवत मॅटर्निटी होम, तर दुसऱ्या इमारतीत मल्टीस्पेशालिटी रुग्णालय असणार आहे. मॅटर्निटी होम संपूर्ण तयार स्थितीत महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात येणार असून खासगी रुग्णालयाप्रमाणे सर्व अत्याधुनिक, दर्जेदार सुविधा येथे उपलब्ध असतील असे खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले. कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून अलीकडेच शास्त्रीनगर रुग्णालयात एक्स रे, एमआरआय, पॅथॉलॉजी सेवा सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.