११ वर्षांनंतर झाली कारवाई
सोलापूर शहरात यापूर्वी २००९ साली मोक्का कायद्यांतर्गत ५ आरोपींवर कारवाई झाली होती. यानंतर ११ वर्षांनंतर मोक्का अंतर्गत कारवाई झाली आहे.
प्रतिनिधी , सोलापूर : मुख्य आरोपी संजय उर्फ लखन गोकुळ परदेशी आणि त्याचे साथीदार सोमनाथ उर्फ सोमा सदाशिव गायकवाड, सोनू उर्फ ध्रुव सदाशिव मोरे अशी या गुन्हेगारांची नावे आहेत. या तिघांनी सोलापूर शहर आणि परिसरात चोरी, घरफोडी, जबरी चोरी, बेकायदेशीर जमाव जमविणे, दुखापत करणे, पोलिसांवर हल्ला करणे, बेकायदेशीरपणे घरात घुसणे, अस्तित्व लपविणे, जनतेच्या संपत्तीचे नुकसान करणे, दहशत माजविणे यांसारखी गुन्हेगारी कृत्ये एकट्याने किंवा एकत्र सातत्याने करत होते.
त्याचबरोबर आपल्या टोळीत नवनवीन गुन्हेगार सदस्य घेत होते. त्यामुळे त्यांच्यावर विजापूर नाका पोलिस ठाणे येथे १५ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात आरोपींना अटकही करण्यात आली होती. यातील टोळी प्रमुख संजय उर्फ लखन गोकुळ परदेशी व त्याचा साथीदार सोनू उर्फ ध्रुव सदाशिव मोरे हे दोघे न्यायालयीन कोठडीत असून सोमनाथ उर्फ सोमा सदाशिव गायकवाड हा जामिनावर मुक्त आहे.
आरोपींनी त्यांची गुन्हेगारी कृत्ये सुरूच ठेवली आहेत. त्यांच्या या कृत्यास पायबंद घालण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ च्या कलम ३ (१)(ii)३(२),३(४) हे कलम वाढ केले आहे. जामिनावर असलेल्या सोमनाथ उर्फ सोमा गायकवाड याचा शोध घेऊन त्याला आणि इतर दोन आरोपींना
मोक्का न्यायालयाचे विशेष न्यायाधीश यांच्यासमोर हजर केल्यानंतर त्यांना १० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
ही कारवाई पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलिस उपायुक्त बापू बांगर (गुन्हे), पोलिस उपायुक्त डॉ. वैशाली कडुकर (परिमंडळ) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त डॉ. प्रिती टिपरे, तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत शेंडगे, सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे, विजापूर नाका पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील व त्यांच्या पथकाने केली आहे.
