प्रतिनिधी , यवतमाळ : बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण हिचा पुणे येथे संशयास्पद मृत्यू झाला. पूजावर यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यात आल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली. त्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयात भेट देऊन डीन डॉ. मिलिंद कांबळे यांना एक पत्र दिले. मात्र, पूजा अरुण राठोड असे नाव असलेली ती 22 वर्षीय तरुणी नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असल्याची नोंद वैद्यकीय महाविद्यालयात आहे.
पूजा चव्हाण मृत्यूप्रकरण आता अधिक गुंता गुंतीचे होत चालले आहे. नेमका मृत्यू कसा झाला, याबद्दल मतप्रवाह आहे. या प्रकरणात एका मंत्र्याचे नाव येत असल्याने हे प्रकरण हायप्रोफाइल झाले आहे. पूजा अरुण राठोड या नावाने एका तरुणीवर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यात आल्याची नोंद आहे. मात्र, ती मुलगी पूजा चव्हाण की, दुसरी हे स्पष्ट झाले नाही. पुणे पोलिसांनी डीन यांना एक पत्र दिले. पूजा चव्हाण नावाची रुग्ण भरती नसल्याचे मेडिकल प्रशासनाकडून स्पष्ट केले. पूजा राठोड हिला सहा तारखेला भरती करण्यात आले होते. तिच्यावर वार्ड क्रमांक तीनमध्ये प्रसूती विभाग प्रमुख यांनी भरती करून उपचार केले.
