जनतेज न्युज

तुमच्या कामातून ब्रँड कोल्हापूर देशभर पोहोचवा : पालकमंत्री सतेज पाटील

प्रतिनिधी , कोल्हापूर : शाहू महाराजांच्या(Shahu Maharaj) कोल्हापूर(Kolhapur) नगरीतील लोकांनी अपाल्या कामाच्या जोरावर जगात नाव कमावले आहे. तुमच्या यशामुळे तुम्हाला जी संधी मिळालेली आहे त्यातून लोकांची सेवा करा.चांगल्या कामातून ब्रँड कोल्हापूर सर्वदूर पोहोचवा, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील(Satej Patil) यांनी केले.

यूपीएससी परीक्षेतील यशाबद्दल कोल्हापूरातील गुणवंतांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार ऋतुराज पाटील , तेजस पाटील, देवश्री पाटील उपस्थित होते. यावेळी नेर्लीच्या डॉ. प्रणोती संकपाळ, राजारामपुरी येथील सौ. गौरी पुजारी-किल्लेदार, जवाहरनगर येथील कु. सौरभ व्हटकर आणि पन्हाळा तालुक्यातील किसरुळ येथील श्री. अजय कुंभार यांचा सत्कार करण्यात आला.

पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून यश मिळवणे हे तुमच्या संयमाचे आणि परिश्रमाचे फळ आहे. या माध्यमातून मिळणाऱ्या पदामधून लोकांची कामे करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.समाजाला दिशा देण्याचे आणि सर्वांगीण विकास करण्यासाठीचा हा राजमार्ग आहे. कामावर निष्ठा ठेऊन कार्यरत रहा आणि कोल्हापूरचं नाव देश आणि जगात अजून पुढे न्या , असे सांगितले.

आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, प्रशासकीय सेवेत अगदी कमी वयातील तरुण पिढी यशस्वी होत आहे.या तरुणांकडे देशाला प्रगतीपथावर नेण्याची क्षमता आहे.तुमचा आदर्श डोळ्यापुढे ठेऊन कोल्हापुरातील अजून अनेक तरुण येणाऱ्या काही वर्षात भारतीय प्रशासकीय सेवेत सामील होतील अशी खात्री वाटते असे ते म्हणाले. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील संवादामुळे अनेक प्रश्न तात्काळ मार्गी लागतात, असेही त्यांनी नमूद केले.