प्रतिनिधी , मुंबई : करोना आणि लॉकडाउन यामुळे भारतात विविध प्रकारची संकटे उभी राहिली आहेत. सध्या देशात करोनाग्रस्तांची संख्या प्रचंड वाढत आहे. राज्यात देखील करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. अशा स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लढाईचा सामना करण्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले . यानंतर सर्वजण आपापल्या परीने मदत करत आहे .
तुळजापूरच्या एका शेतकऱ्याने सोशल मिडीयाच्या मदतीने सरकारला मदत म्हणून आपल्या शेतातील केळी घेऊन जाण्याच आवाहन केले आहे. ही केळी गरीब आणि गरजू नागरिकांमध्ये वाटून टाका. कारण त्यांची एक वेळची भूक तरी भागेल असे या शेतकऱ्याने आपल्या व्हिडीओमध्ये म्हंटले आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्याची ही व्हिडीओ क्रिकेटर अजिंक्य राहणे याने स्वतः शेअर केली आहे. तसेच राहणे यांनी या शेतकऱ्याचे तोंडभरून कौतुकही केले .
कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी सर्व स्तरातून मदतीचा ओघ येत आहे. कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वारंवार आपल्याला घरीच राहण्याची कळकळीची विनंती करत आहेत. त्यांची ही विनंती योग्य आहे, परंतु गरीब कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. मी शेतकरी आहे आणि मी आर्थिक मदत करू शकत नाही. पण, माझी दोन एकर केळीची शेती आहे. त्यामुळे माझ्या शेतातील केळी काढणीला आली आहेत आणि ही केळी मी त्या गरजूंनी देऊ इच्छितो. शासनाला माझी विनंती आहे की त्यांनी ही केळी घेऊन जावी आणि गरिबांना द्यावी. किमान त्यांचे एक वेळेची भूक मिटेल, असे त्या शेतकऱ्यांने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे .
दरम्यान अजिंक्य राहणे याने देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक मदत केली आहे. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायता निधीला १० लाख रुपयांची मदत केली आहे, हे विशेष .
