जनतेज न्युज

दगडूशेठ गणपतीची १२७ वर्षांची परंपरा खंडित, यंदा गणेशोत्सव मुख्य मंदिरातच होणार

प्रतिनिधी , पुणे : कोरोना (Corona) विषाणूच्या संकटामुळे पुण्यात यंदा गणेशोत्सव मंडपात नव्हे, तर मंदिरात करावं, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले होते. पोलिसांच्या या आवाहनाला चांगला प्रतिसादही मिळत आहे. पुण्याच्या गणेशोत्सवातील मुख्य आकर्षण असलेल्या दगडूशेठचा गणेशोत्सव यंदा मुख्य मंदिरातच होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्यहिताच्या दृष्टीने हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या १२७ वर्षांची परंपरा यंदा प्रथमच खंडित होत आहे. मात्र, अद्यापपर्यंत मंदिरं बंद असल्याने मंदिरांमध्ये गणेशोत्सव कसा साजरा करायचा, याबाबत मंडळांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, उत्सव प्रमुख हेमंत रासने, महेश सूर्यवंशी सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे आणि महापौरांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी सर्वांना विश्वासात घेऊन गणेशोत्सव साजरा करणार आहोत. गर्दी नियंत्रित ठेऊन कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं.

यंदा हा स्वल्पविराम असून पुढील वर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करु. यंदा गणेशोत्सवाला मंदिराला प्राधान्य द्यावं. मंदिर नसेल तर छोट्या जागेत बाप्पांची प्रतिष्ठापना करावी, अशी भूमिका महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मांडली. मात्र, कोणतीही सजावट नको. प्रतिबंधित भागात रुग्णवाहिकेसाठी जागा ठेवण्याचं आवाहन महापौरांनी केलं. तर, दरवर्षी साधारण पाच लाख घरगुती गणपतींचं विसर्जन होतं. त्यामुळे यंदा घरगुती बाप्पांचं सुद्धा विसर्जन घरातच करावं. मंडळांच्या श्रींचे सुद्धा मंदिरात विसर्जन होईल. त्यामुळे यंदा विसर्जन कृतीम हौद, विसर्जन घाट निर्माण केले जाणार नसल्याचं महापौरांनी सांगितलं.

यंदा दगडूशेठ हलवाई गणेशोत्सवात आरोग्यविषयक जनजागृती आणि आरोग्यसेवा देण्यात येणार आहेत. मंदिराच्या परिसरात पूर्णवेळ रुग्णवाहिका देखील असणार आहे. मंदिरामध्ये प्रवेश न करता बाहेरुनच बाप्पांचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. हार, फुले, पेढे, नारळ देखील स्विकारले जाणार नाहीत आणि प्रसाद दिला जाणार नाही. त्याचबरोबर उत्सवाचे मुख्य आकर्षक असलेले सामुहिक महिला अथर्वशिर्ष पठण, शालेय विद्यार्थी अथर्वशिर्ष पठण यांसह इतर कार्यक्रम देखील रद्द करण्यात आलेत.

अभिषेक, पूजा, आरती, गणेशयाग असे सर्व धार्मिक विधी मंदिरामध्ये गुरुजींद्वारे केले जाणार आहेत. भक्तांतर्फे स्वहस्ते होणारा अभिषेक देखील रद्द करण्यात आला आहे. यावर्षी भक्तांकरीता अभिषेक व्यवस्था ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली आहे. भक्तांनी नाव आणि गोत्र नोंदणी केल्यास त्यांच्यावतीने मंदिरामध्ये गुरुजींद्वारे अभिषेक होऊ शकेल. मंदिर परिसरात दर्शनासाठी येणाऱ्यासाठी एलईडी स्क्रिनची सीसीटीव्ही व्यवस्था करण्यात येणार आहे.