प्रतिनिधी ,नंदुरबार : शहराचा दिवसेंदिवस भौगोलिक विस्तार वाढत असतांना अनेक नवीन वसाहती तयार झाल्या आहेत परंतु वसाहती तयार होत असतांना त्या वसाहतींना मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे. ग्रामस्थांनी शहरालगतच्या ग्रामपंचायत हद्दीत प्लॉट घेऊन त्याठिकाणी बांधकामे केली आहेत . मात्र अनेक वर्ष झाली तरी शहरालगतच्या वसाहतीत राहणाऱ्या ग्रामस्थांना मुलभूत सुविधाही मिळत नसल्याचे विदारक चित्र समोर आले आहे .
दुधाळे शिवारातील अनेक वसाहती मध्ये मूलभूत सुविधा चा अभाव आहे , जिल्हाधिकारी यांच्याकडे मुलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी साठी अनेकदा निवेदन देण्यात आले. प्रशासनाकडे तक्रार करूनही नागरी सुविधा मिळत नसल्याने वसाहतीमधील नागरिकां मध्ये नाराजीचा सूर आहे . नंदुरबार शहरालगतच्या देवमोगरा हिल्स, शरद घरकुल, जोगेश्वरी नगर, कैलासपती नगर, शिनकर नगर, एकलव्य नगर, स्नेहल पार्क, जडाबाई नगरात अनेक वर्षांपासून ग्रामस्थ वास्तव्य करत आहेत. दरवर्षी ग्रामपंचायत हद्दीत राहणारे हे ग्रामस्थ ग्रामपंचायतीचा कर भरतात. तरीही त्यांना रस्ते , पाणी आणि विजेची सुविधा उपलब्ध होत नाही आहे. दुधाळे शिवारातील अनेक वसाहतीमध्ये घराची बांधकामे पूर्ण झाल्याने ग्रामस्थ तेथे वास्तव्यास आहेत. परंतु येथील नागरी वस्त्यांमध्ये साधे रस्ते नाहीत. विजेची सोय नाही, नळजोडणी नाही. पथदिव्यांचे कुठेच नामोनिशाण नाही. नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी ग्रामपंचायतीकडे करतात. परंतु ग्रामसेवक अथवा सरपंचांकडून समाधान कारक उत्तर मिळत नाही. यामुळे नागरिकांच्या पदरी निराशाच पडत आहे. दुधाळे ग्रामपंचायत हद्दीतील अनेक वसाहतीमध्ये रस्ते नसल्यामुळे वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागतो. उन्हाळ्यात नागरिकांना 600 रु खर्चून टँकर द्वारे पाण्याची सोय करावी लागते तर पावसाळ्यात रस्ते नसल्यामुळे ग्रामस्थांचे अतोनात हाल होतात. म्हणून स्थानिकांनी स्वखर्चाने मुरूम, माती टाकून तात्पुरता रस्ता तयार करून घेतला आहे. यावर्षीही पावसाळ्यात तेच हाल होतात की काय असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. प्रशासनाने दुधाळे शिवारातील वसाहतींमध्ये रस्ते, वीज आणि पाण्याची सोय करून द्यावी. अन्यथा, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असे ग्रामस्थांनी सांगितले.
