प्रतिनिधी , सांगली : हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक असणाऱ्या मिरजेतील ख्वाजा मिरासाहेब दर्गा उरूस यंदाही रद्द करण्यात आला आहे. प्रशासन आणि दर्गा कमिटीच्या मध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे,त्यामुळे भाविकांना यंदाच्या वर्षीही उर्स दरम्यान दर्शन घेता येणार नाही .
मिरजेतील ख्वाजा मिरासाहेब दर्ग्याचा यंदाचा 646 उरूस आहे.9 मार्च पासून हा ऊरूस सुरू होणार आहे मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्यांदा उर्सावर निर्बंध आले आहेत.राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत, शासनाकडून कोरोनाच्या नियमांची पुन्हा कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे.राज्यात सभा,यात्रा,उत्सव यावर बंदी घालण्यात आलेली आहे.त्याच धर्तीवर मिरजेतील उर्स आता रद्द करण्यात आला आहे.प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दर्गा कमिटी आणि प्रशासनाची उरूस बाबत बैठक संपन्न झाली.यामध्ये कोरानाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा उरूस रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.गेल्यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उर्स रद्द करण्यात आला होता,आणि आता दुसरयांदा हा उर्स रद्द झाला आहे दरवर्षी उर्साच्या निमित्ताने महाराष्ट्र,कर्नाटक,आंध्र प्रदेश गुजरातसह देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक मिरज नगरीत दाखल होत असतात,याशिवाय उर्साच्या निमित्ताने संगीत महोत्सव पार पडत असतो,पण तोही यंदाच्या वर्षी रद्द करण्यात आला आहे.त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी उर्स दरम्यान भाविकांना दर्शन घेता येणार नसून भाविकांनी या दरम्यान दर्शनासाठी येऊ नये,असे आवाहन प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी समीर शिंगटे आणि दर्गा कमिटीच्या वतीने असगर शरीकमसलत यांनी केले आहे.
