जनतेज न्युज

जनतेच्या २० कोटींची उधळपट्टी कशासाठी ? शहरभर रस्त्यावर खड्डे आणि इथे चांगल्या रस्त्यावर २० कोटी अनावश्यक खर्च ! : आम आदमी पार्टी

प्रतिनिधी , पुण्यात पावसाळ्यात पडत असलेले खड्डे आणि त्यावरची तात्पुरती डागडुजी पुणेकरांनी पहिलीच आहे . या निमित्ताने पुण्यात आर्थिक निधीचा तुटवडा असून त्यामुळे नाराज नगरसेवकांचा आवाज ही ऐकला. पण एकीकडे हे चालू असताना संगमवाडी येथील सुस्थितीतील रस्त्यावर , अजून एकही खड्डा नसताना त्यावर २० कोटी खर्च करून सिमेंट रस्ता तयार करण्याचे काम जोरात चालू आहे. सदरचा रस्ता अंदाजे दीड किलोमीटर चा आहे व त्याची रुंदी ३० मीटर आहे.या पूर्ण पावसाळ्याचा काळात या रस्त्यावर एकही खड्डा पडलेला नाही. असे असताना मनपा मधील भाजपा च्या सत्ताधार्यांनी हा रस्ता सिमेंटचा करण्याचे काम सुरु केले आहे. या रस्त्यावर पाणी , मल निस्सारण, विद्युत अथवा टेलिफोन लाईन्स चे जाळे नाही. त्यामुळे कुठलीही खोदाई वा दुरुस्ती या रस्त्यावर करावी लागलेली नाही. असे असताना पंधरा दिवसापूर्वी स्थानिक आमदार व नगरसेवकांच्या पुढाकाराने हे काम सुरु झाले आहे. हा रस्ता सिमेंट चा झाल्यावर त्याची उंची जास्त होईल व त्यामुळे दोन्ही बाजूचे फुटपाथ ही नव्याने करावे लागणार आहेत. याचा खर्च तब्बल २० कोटी आहे .

आज आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी संगमवाडी रोड वर केंद्रीय विद्यालय चौकात या उधळपट्टी विरोधात आंदोलन केले. ‘शहरभर रस्त्यावर खड्डे पडले असताना तिथे निधी नसल्याचे कारण देत डागडुजी चालू आहे मात्र जो रस्ता उत्तम आहे, ज्यावर एकही खड्डा नाही त्या रस्त्यवर सिमेंट रस्ता बनवण्याचे काम चालू आहे . ही जनतेच्या पैशाची उधळपट्टी असून केवळ मनपा निवडणुकीपूर्वी टक्केवारी मिळवण्यासाठीच ही अनावश्यक कामे केली जात आहेत. हा रस्ता अजूनही अपूर्ण असलेल्या शिवणे ते खराडी रस्त्याचा भाग म्हणून संगमवाडी ते सादलबाबा चौक रोड यापूर्वी यावर बांधण्यात आला आहे , आता पुन्हा एकदा हाच रस्ता सिमेंट चा तयार केला जात असून जनतेच्या पैशाची उधळपट्टी कशी केली जाते याचे उत्तम उदाहरण आहे‘ असा आरोप आप चे मुकुंद किर्दत यांनी केला आहे .

शिवाजीनगरमधील संगमवाडी, पाटील इस्टेट, चिखलवाडी , कस्तुरबा वसाहत या भागातील अंतर्गत रस्ते पूर्ण उखडून गेले आहेत . नाले साफसफाई साठी निधी नाही असे असताना संगमवाडी रस्ता सिमेंटचा करणे योग्य नाही . हे काम तातडीने थांबवायला हवे ‘ अशी मागणी आप चे शिवाजीनगर अध्यक्ष सतीश यादव यांनी केली आहे.      

आजच्या आंदोलनात सतीश यादव, संकेत कुलकर्णी, रोहन रोकडे, सुजित अग्रवाल, अभिजीत मोरे, विक्रम गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड, आकाश मुनियन, विकास लोंढे, योगेश इंगळे, संदीप सोनावणे, ह्रुषिकेष मारणे, गोविंदराव सोमवंशी, तुषार कासार, मुकुंद किर्दत सामील झाले होते.