जनतेज न्युज

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पाच लाख पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल.

प्रतिनिधि , सिंधुदुर्ग : कोरोनाच्या सावटाखाली यंदाच्या पर्यटन हंगामाला फटका बसला असला तरी. सरकारने आता पर्यटनाला परवानगी दिली आहे. त्यामुळे आता 2020 वर्षाला निरोप देण्यासाठी देशभरातून पर्यटक कोकणात दाखल होत आहेत. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जिल्ह्यात दरवर्षी 10 ते 15 लाख पर्यटक येतात. मात्र, यावर्षी कोरोनाच्या भीतीने पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. आतापर्यंत फक्त पाच लाख पर्यटक दाखल झाले आहेत. मुंबई, कलकत्ता या भागातून पर्यटक येथील समुद्र किनारी दाखल झाले आहेत. रेल्वे हा येथे येण्याचा सोयीचा मार्ग असल्याने सध्या रेल्वे स्टेशनवर सुद्धा गर्दी पहायला मिळत आहे.

सिंधुदुर्ग हा पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण आहे. येथील मालवण, वेंगुर्ला, देवगड या भागातील स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनारे, तारकर्लीत होणार डॅाल्फीनचं दर्शन, सिंधुदुर्ग किल्ला तसेच नारळी पोफळीच्या बागा येथील मालवणी जेवण पर्यटनाचं आकर्षण आहे. ख्रिसमसच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येथे येतात. मुंबई, पुणे, कलकत्ता आदी भागातून पर्यटक या ठिकाणी दाखल होत असतात. गोव्यात वाढती गर्दी लक्षात घेता पर्यटकांना गोव्याच्या जवळ असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा उत्तम पर्याय असतो. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची मोठी वर्दळ असते.यावर्षी कोरोनाचा प्रभाव राहिल्याने पर्यंटकांचा ओघ कमी झाला आहे.सध्या जिल्ह्यात कोरोनाचे सावट असले तरी पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल होताना दिसत आहेत. यावर्षीचा 31 डिसेंबर साजरा करण्याचा जोश असला तरी त्यात कोरोनाची भीती मात्र नक्कीच आहे.