प्रतिनिधि , नांदेड : नांदेड जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतीच्या कारणावरून दोन गटात तुफान दगडफेक झाली आहे. बिलोली तालुक्यातील मुतन्याळ या गावात ही घटना काल घडली आहे. दगडफेक आणि लाठ्या काठ्यांनी झालेल्या मारहाणीत ३० जण जखमी झाले असुन जखमींवर देगलूर, बिलोली आणि नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दगड पेकीत अनेक घरांचही नुकसान झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला मात्र, बिथरलेल्या जमावाने यावेळी पोलिसांवरच दगडफेक सुरु केली.
यावेळी अतिरिक्त पोलिस बोलावून परिस्थिती नियंत्रणात आणली गेली. अतिरिक्त पोलिस अधिक्षक निलेश मोरे यांनी घटनास्थळावर भेट देत परिस्थिती ची पाहणी केली. तुंबळ हाणामारी करणाऱ्या दोन गटातील ८० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत ३८ जणांना अटक केली असुन उर्वरित आरोपींचा शोध पोलिस करीत आहेत. यामुळे मुतन्याळ गावात भितीचं वातावरण असून अनेकजण गाव सोडून जात आहेत. गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आली असल्याची माहिती पोलीस उप-अधीक्षक सिद्धेश्वर धुमाळ यांनी दिली.
