प्रतिनिधि , पक्षांतर्गत राजकारणामुळे बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. काल बाळासाहेब थोरात यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटीही घेतल्याची माहिती मिळत आहे. मात्र मी अद्याप राजीनामा दिलेला नाही, पण जर तरुणांना संधी मिळणार असेल तर मी त्यांच्या पाठीशी उभा राहिन, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. “मी राजीनामा देण्यासाठी दिल्लीला गेलो नव्हतो, दर महिन्याचे काही विषय असतात त्यावर चर्चा करण्यासाठी मी दिल्लीला गेलो होतो. परंतु, ही बातमी मलाही दिल्लीला समजली. ज्यावेळी निवडणूक झाली, मंत्रिमंडळाचं गठन झालं. त्यावेळीच मी दिल्लीमध्ये जाऊन सांगितलं होतं की, मी प्रदेशाध्यक्ष आहे, महसुल मंत्री आहे, विधिमंडळ काँग्रेसचा नेताही आहे. माझ्याकडे यासर्व जबाबदाऱ्या आहेत. मी उत्तमरित्या सांभाळीन, परंतु, तुम्हाला कधी वाटलं की, यापैकी काही जबाबदाऱ्या इतर कोणाकडे सोपवायच्या आहेत, तर माझी त्याला हरकत नाही.
