प्रतिनिधी , पुणे : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी भाजपाचे (BJP) प्रवक्ते व पॅनेलिस्ट यांची नियुक्ती जाहीर केली आहे. यामध्ये आज 10 प्रवक्ते व 33 पॅनल सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. भाजपाने आज अनेक नवीन लोकांना पक्षात मोठी संधी दिली आहे. त्यातच लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पवार कुटुंबियांना टक्कर देणा-या सदस्यांना भाजपने जबाबदारीची पदे सोपवल्याचे दिसत आहे.
सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना लोकसभा निवडणुकीत आव्हान देणाऱ्या कांचन कुल (Kanchan Kul) यांची पुणे जिल्हा भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. कांचन कुल या बारामतीत सुप्रिया सुळेंच्या विरोधात लोकसभेच्या भाजप उमेदवार होत्या. पण त्याना पराभवाला सामोरे जावे लागले होते.
कांचन कुल या दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांच्या पत्नी आहेत. कांचन कुल यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक बारामती लोकसभा मतदारसंघातून लढवली होती. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना आव्हान दिले होते. त्यामुळे ती निवडणूक लक्षवेधी ठरली होती.
कांचन कुल यांचा त्या निवडणूकित पराभव झाला. असला तरी त्यांची लोकप्रियता चांगलीच वाढली असल्याने भाजपने त्यांना पुणे जिल्हा महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षपद देऊन सक्रिय राजकारणात आणले असेच म्हणावे लागले. कांचन कुल यांचे पती आमदार राहुल कुल हे पुणे जिल्हातील भाजपचे एकमेव आमदार आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे समजले जातात.
तसेच, शरद पवारांवर टीका करणारे गोपीचंद पडळकर यांनाही भाजपने मोठी जबाबदारी दिली आहे. गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना पश्चिम महाराष्ट्राचे भाजपचे प्रवक्ते करण्यात आलं आहे. तसंच गेल्याच वर्षी भाजपवासी झालेले धनंजय महाडिक यांच्यावरही पश्चिम महाराष्ट्र प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
एकूणच पवारांचे विरोधक वा पवार कुटुंबियांना टक्कर देणा-या लोकांसाठी भाजपाने जबाबदारीची पदे देऊन भविष्यात राष्ट्रवादी विरुद्ध बाजपा असा सामना रंगण्याचे हे म्हणावे लागेल.
