प्रतिनिधी , पाचोरा : व्ही. आय. टी. भोपाल युनिव्हर्सिटीने आयोजित केलेल्या पोस्टर मेकिंग स्पर्धेत वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेकनोलॉजी कॉलेजचा व रंगश्री आर्ट पाचोऱ्याचा विद्यार्थी श्रेयस सोमपूरकर याने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले आहे. यात असंख्य विद्यार्थ्यांमधून श्रेयस च्या चित्राची निवड झाली. या स्पर्धेची थीम होती “बालभिक्षावृत्ती” (चाइल्ड स्ट्रीट बेगर्स) लहान मुलांची सुरक्षा, त्यांचे संवर्धन या संबंधी विचार जनसामान्यांपर्यंत पोहचवावे हा या स्पर्धेचा उद्देश होता. आणि तो उद्देश श्रेयश च्या चित्रातून परीक्षकांना जाणवला. त्या रस्त्यावरील लहान मुलांना दान द्यावे पण.. ते पैश्याच्या स्वरूपात न देता त्यांना चांगले अन्न दयावे, शिक्षण मिळावे, उत्तम आरोग्यासोबतच आनंद मिळावा, त्यांच्याशी मैत्री होऊन त्यांना परिवाराची छाया मिळावी असा या चित्रातून बोध होतो.
श्रेयश याने इयत्ता ४ थीत या बालवयात रंगश्री आर्ट फाऊंडेशन, पाचोरा येथे प्रवेश मिळविला. तेव्हापासून कलेचा छंद जडला तो आजतागायत आहे. अभ्यासातही तेवढाच हुशार… १० वीत त्याला ९३ टक्के गुण मिळाले. त्याने भोपाळ युनिव्हर्सिटीत इंजिनिअरिंग कॉम्पुटर सायन्समध्ये प्रवेश मिळविला आणि तेथेही त्याने कलेचा डंका वाजविला आणि तो कलेचा छंद जोपासत आहे. आता पर्यंत त्याने पेन्सिल शेडिंग मध्ये पोट्रेट, कलर पेन्सिल, व वॉटर कलर मध्ये निसर्ग चित्र यात ही त्याचा हातखंडा होता. तसेच रंगश्री चा पहिला पेन मध्ये पोट्रेट करणारा विद्यार्थी होता. त्याने मदर तेरेसा, आनंद ऋषीजी, लोकमान्य टिळक, ए. पी. जे. अब्दुल कलाम, सुभाषचंद्र बोस, भारद्वाज पक्षी अशी अनेक चित्र रेखाटली आहेत.
तो पाचोऱ्यातील बुऱ्हानी इंग्लिश मेडीयम स्कूलचा माजी विद्यार्थी आहे. श्रेयस याचे सुबोध कांतायन, भारती कांतायन व रंगश्री परिवारातील अजय पाटील, वैभव शिंपी, अक्षय पाटील, श्रेयश चिंचोले, शुभम पाटील व इतर कलावंत विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे. तसेच परिसरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
