आयुक्त अजीज शेख यांनी केले आवाहन…
प्रतिनिधी ,धुळे : हातनूर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात येत असल्याने तसेच सुलवाडे बॅरेजचे गेट उघडे केल्याने सुकवद येथील पंपिंग स्टेशनवर अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे धुळे शहरातील गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांनी पाणी गाळून आणि उकळून वापरावे, असे आवाहन धुळे महानगर पालिका प्रशासनाने केले आहे.
हातनूर धरणातून मोठ्या प्रमाणावर झालेला पाण्याचा विसर्ग यामुळे तापी नदीस फार मोठ्या प्रमाणावर पूर आलेला आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाण्यात गाळाचे प्रमाणही वाढलेले आहे. तसेच सुलवाडे बॅरेजचे गेट उघडे केल्याने सुकवद पंपिंग स्टेशन येथेही अडचण निर्माण होत आहे. पाण्यातील गाळ व पाण्यातील टरबीडीटी वाढल्यामुळे पाणी शुद्धीकरण कामातही अडथळे निर्माण होत आहे.
तापी नदीच्या पुरामुळे पाणी गढूळ व गाळ मिश्रीत येत असून शुद्धीकरण प्रक्रियेत तांत्रिक अडचणी निर्माण झालेले आहेत. या सर्व बाबींमुळे पंपिंग स्टेशन व शुद्धीकरण केंद्र येथे प्रक्रिया करण्यास विलंब लागत आहे. त्यामुळे धुळे शहरात दोन दिवस उशिराने पाणीपुरवठा करण्यात येईल. याबाबत नागरिकांनी नोंद घ्यावी तसेच पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन धुळे मनपाचे आयुक्त अजीज शेख यांनी केले आहे.
