प्रतिनिधी , पुणे : पुणेकरांसाठी कडक लॉकडाऊनमध्ये (Lockdown) जिल्हा प्रशासनानं एक खुशखबर दिली आहे. पुण्यात १३ ते १८ या लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यानंतर नियमांमध्ये काहीशी शिथिलता देण्यात आली आहे. नवे पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पुणेकरांना थोडा दिलासा दिला आहे. जीवनाश्यक वस्तू खरेदीसाठी उद्याच्या रविवारी १९ जुलै रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ६ पर्यंत दुकानं खुली राहणार आहेत. तर सोमवारपासून सकाळी ८ ते दुपारी 12 पर्यंत दुकाने उघडी राहणार आहे. तर २३ जुलैपर्यंत दारु दुकानं बंदच राहणार आहेत.
दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या दिवशी दुकानांसमोर गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत मनपा प्रशासन आणि पोलीस प्रशासनात विचारविनीमय सुरु होता. त्यानंतर ही शिथिलता देण्यात आली. नियमांचे पालन करुन हळूहळू शिथिलता देण्यात येईल, असं आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितलं.
पिंपरी चिंचवडमध्येही शिथीलता देण्यात आली आहे. रविवारी अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी किराणा माल, भाजी विक्रेते आणि मटण-चिकन-मासे-अंडी विक्रेत्यांना विक्री करण्यास मुभा आहे.१९ जुलै म्हणजे उद्या शहरात गर्दी होईल म्हणून सकाळी ८ ते सायंकाळी ६ दरम्यान ही दुकानं खुली राहतील. तर नंतर अत्यावश्यक वस्तूची विक्री करण्यास २० जुलै ते २३ जुलै दरम्यान सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंतच परवानगी असेल.
