जनतेज न्युज

फडणवीस म्हणाले, ‘माझा आवाज कोणी दाबू शकत नाही’ आणि अजितदादांना हसू आवरेना

प्रतिनिधी, पुणे : आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांच्या उपस्थितीत बाणेर इथे कोव्हिड (Covid-19) सेंटरचं उद्घाटन झालं. अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस एका मंचावर येत असल्याने, सर्व राजकीय वर्तुळाच्या नजरा त्यांच्यावर लागल्या होत्या.
यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान देवेंद्र फडणवीस भाषण करताना माईकमधून आवाज येत नव्हता. त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी ‘आवाज आवाज’ असं सांगितलं.
त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी मास्क खाली घेऊन, माझा आवाज कोणी दाबू शकत नाही, असे म्हणताच देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूला असलेले अजित पवार यांना हसू आवरता आले नाही. दरम्यान, त्याआधी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजनयुक्त २०० बेड्सच्या रुग्णालयाचं उद्घाटन झालं.