जनतेज न्युज

बिजप्रक्रिया केल्याशिवाय सोयाबीन बियाण्याची पेरणी करू नका

प्रतिनिधी, सांगली : सोयाबीन पिकावर खोडमाशी या किडीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होतो. खोडमाशी सोयाबीन पीक उगवून आल्यानंतर पिकाच्या खोडाला सूक्ष्म छिद्र पाडू खोडामध्ये जाते. त्यामुळे जमिनीतून पानाकडे होणाऱ्या अन्नपुरवठ्यामध्ये बाधा येऊन शेंगांमध्ये दाणे भरण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होऊन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते व पापडी होण्याचे प्रमाण वाढते. पिक उगवल्यापासून एक महिन्याच्या कालावधीत तीन पिढ्या तयार होतात. सोयाबीन पिकावरील खोडमाशी व रस शोषणाऱ्या किडी पासून संरक्षण करण्यासाठी थायोमिथॉक्झाम ३०% एफएस (क्रुझर ) या कीडनाशकाची 60 मिली प्रति 10 किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. त्याचप्रमाणे नत्र खतामध्ये बचत करण्यासाठी व जमिनीतील स्थिर झालेला स्फुरद उपलब्ध स्वरूपात करून देण्यासाठी रायझोबियम व पीएसबी या जिवाणू खतांची २५० ग्रॅम प्रति 10 किलो बियाणे याप्रमाणे बिजप्रक्रिया करावी. सोयाबीन या पिकाचा अंकुर डाळीच्या बाहेरील बाजूस असल्यामुळे वाहतुकीत बियाण्आयाची आदळआपट झाल्यास त्याचा अंकुर मोडण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यानी बियाणे घरचे असो किंवा विकत घेतलेले असो त्याची उगवण क्षमता तपासणी केल्याशिवाय सोयाबीन बियाण्याची पेरणी करू नये. यासाठी पाटावर वर्तमानपत्राचा पेपर अंथरून पूर्णपणे ओला करावा. या पेपरवर उभ्या १० व आडव्या १० ओळी याप्रमाणे पेरणीसाठी वापरावयाच्या बियाण्यातील १०० बिया घेऊन मांडणी करावी. नंतर या पेपरची गुंडाळी करून दोन्ही बाजूनी दुमडावे व ताटात ठेऊन अंधाऱ्या जागी २-३ दिवस ठेवावे. दरम्यान रोज सकाळ व संध्याकाळी या कागदावर पाणी शिंपडून कागद ओला करावा. 48 तासात सोयाबीन बियाण्याची रुजवण होते. तिसऱ्या दिवशी ही घडी उघडून १०० दाण्यापैकी किती दाणे रुजले यावरून बियाण्याची उगवण क्षमता समजते. १०० दाण्यापैकी ७० पेक्षा जास्त दाणे रुजले तर हे बियाणे पेरणीसाठी योग्य असल्याचे समजावे. अशा प्रकारे घरगुती पद्धतीने सोयाबीन बियाण्याची क्षमता तपासून पेरणी केल्यास आपला मजुरी व बियाणे वरील खर्चात बचत करता येईल.