प्रतिनिधी , वाशिम : वाढता उत्पादन खर्च आणि शेतमालाला मिळणारे दर यामध्ये मोठी तफावत असल्याने विदर्भात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. मात्र वाशिम जिल्ह्यातील बिटोडा तेली येथील
सदाशिव राऊत या शेतकऱ्यांनी दीड एकर क्षेत्रावर शेंद्रिय भाजीपाला घेत विदेशी भाज्यांचा प्रयोग यशस्वी केला आहे. त्यामुळं अवघ्या दीड एकर शेतात आपलं 11 जणांचं कुटुंब यशस्वी चालवीत आहेत.
वाशिम जिल्ह्यातील बिटोडा तेली येथील सदाशिव राऊत यांचेकडे दीड एकर शेती आहे. यामध्ये पारंपारिक पद्धतीने शेती करीत असताना त्यांना कुटुंब जगण कठीण झालं होतं. मात्र त्यांनी शेंद्रिय शेतीचा मार्ग निवडला आणि भाजीपाला घेणं सुरू केले.
शेंद्रिय भाजीपाल्याला बाजारात चांगले दर मिळत नसल्याने त्यांनी विक्री करण्यासाठी वाशिम शहरातील डॉक्टर, वकील,अधिकारी यांचा एक वॉट्स ऍप ग्रुप तयार करून त्यांना मागणीप्रमाणे घरपोच भाजीपाला देत आहेत. त्यामुळं त्यांना चांगला नफा मिळत असून, ग्राहकांना विषमुक्त भाजीपाला मिळत आहे. शेंद्रिय भाजीपाला करीत असताना त्यांनी विदेशी भाजीपाला घेणे सुरू केले.
यामध्ये लेटूस, रेडकॅबिज, आणि ब्रोकोली या तीन प्रकारच्या भाज्या विदेशी भाज्या ते घेत असून हा प्रयोग यशस्वी केला आहे. या भाज्यांना पुणे,मुंबई ला तीनशे रुपयांपर्यंत दर मिळतो मात्र वाशिम 120 रुपये प्रमाणे विक्री करीत असल्याचे त्यांनी सांगितलंय. सदाशिव राऊत यांनी सेंद्रिय देशी भाजीपाल्यासोबत विदेशी भाजीपाला पिकविण्याचा प्रयोग केला आहे. एरवी विदेशी भाजीपाला हा पॅलिहाऊस शिवाय पिकवता येत नाही हा समज आहे. मात्र सदाशिव राऊत यांनी सेंद्रिय पध्दतीने उघड्या शेतात विदेशी भाजीपाला पिकविला आहे. दिवसेंदिवस वाढत असलेले रासायनिक कीटकनाशके आणि खतांचा वापर त्यामुळे मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र राऊत यांनी उत्पादन खर्च कमी करून भाजीपाला पिकवीत असल्याने त्यांना तर फायदा होतोच शिवाय नागरिकांना विषमुक्त भाजीपाला मिळत आहे. त्यामुळं इतर शेतकऱ्यांनीही यांच्या प्रमाणे शेंद्रिय शेती केल्यास त्यांना चांगला फायदा होईल यात मात्र शंका नाही.
