प्रतिनिधी , बुलडाणा : बुलडाणा येथील शासकीय निरीक्षण व बाल गृहातील दोन विधी संघर्षग्रस्त बालकांनी टॉवेल व बेडशिटच्या सह्याने लोखंडी अँगलला गळफास घेवून आत्महत्या केली.ही घटना आज शनिवारी सकाळी ७ वाजता उघडकीस आली. मंगेश डाबेराव वय वर्ष 15 आणि गजानन बांगरे वय वर्ष 17 अशी आत्महत्या केलेल्या विधी संघर्षग्रस्त बालकांची नावे आहेत. सदर आत्महत्या मानसीक तणावामुळे केल्याचे प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. तर आत्महत्या केल्याची घटना शासकीय निरीक्षण व बाल गृहामधील लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.. बुलडाणा शहरातील शासकीय निरीक्षण व बाल गृहामध्ये मंगेश डाबेराव वय वर्ष 15 आणि गजानन बांगरे वय वर्ष 17 शेगाव येथील असून शेगाव शहरामधील सरस्वती महाविद्यालया जवळ झालेल्या घरफोडीमध्ये विधी संघर्षग्रस्त म्हणून २३ नोव्हेंबरला बालन्याय मंडळाच्या आदेशाने दाखल झाले होते. दरम्यान आज ५ नोव्हेबरला शनिवारच्या पहाटेच्या सुमारास दोन्ही विधी संघर्षग्रस्त बालकांनी टॉवेल व बेडशीटच्या सह्याने टिनाखाली असलेल्या लोखंडी अँगलला गळफास घेवून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच बुलडाणा शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रदिप साळुखे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. दरम्यान जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद चावरीया, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते,प्रभारी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अरविंद रामरामे यांनी घटनास्थळी भेट देवून घटनास्थळाचे अवलोकन केले. आपल्याला येथून कोणीच सोडवणार नाही, आपल्याला येथून पळता येणार नाही, म्हणून आपल्याला जीवनभर येथेच रहावे लागणार या मानसीक तणावामुळे विधी संघर्षग्रस्त दोन्ही बालकांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी बुलडाणा पोलिस स्टेशनला मर्ग दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुधाकर गवारगुरु हे करीत आहे.
