जनतेज न्युज

भाजपा नगरसेवकांमध्ये उभी फुट, नगरसेवकांचा एक गट अज्ञातस्थळी रवाना माजी महापौर नितीन लढ्ढा यांची माहिती

प्रतिनिधी , जळगाव :-जळगाव महापालिकेत भाजपला तब्बल ५७ जागा मिळाल्या असून या खालोखाल शिवसेनेला १५ तर एमआयएमला तीन जागा मिळाल्या होत्या. आता १८ मार्च रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीत शिवसेनेने चतुर खेळी करून भाजपमधील एका मोठ्या गटाला गळास लावले आहे. तर, एमआयएम देखील आमच्या सोबत असल्याचा दावा आज माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी केला आहे. यामुळे आता महापालिकेत शिवसेना, भाजपचा फुटीर गट आणि एमआयएम अशी नवीन आघाडी आकारास येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.आता १८ मार्च रोजी भाजप विरूध्द शिवसेना, भाजपचा फुटीर गट आणि एमआयएम या दोन आघाड्यांमध्ये लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात शिवसेनेने सावधगिरी म्हणून आपल्या सदस्यांसह फुटी गटाला सहलीवर पाठविले आहे. तर, भाजपचे नेते देखील कसलेले असल्यामुळे ते सहजासहजी सत्ता सोडणार नसल्याची बाबही दुर्लक्ष करण्याजोगी नाही. यामुळे आता १८ मार्च रोजी नवीन आघाडी बाजी मारणार की भाजप सत्ता कायम राखणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.