प्रतिनिधी , बुलडाणा- सन 1 जानेवारी 1818 मध्ये पुण्यातील पेशवाई संपविण्यासाठी व बहुजनांना समतेची वागणूक मिळावी म्हणून इंग्रजांसोबत महार जातीतील 500 सैनिकांनी बाजीराव पेशवे यांच्या 28 हजार सैन्याचा पराभव करुन पेशवाई नष्ट केली. महार जातीच्या सैनिकांचे शौर्य स्मरण करण्याकरीता दरवर्षी भीमा कोरेगाव येथील स्मृतीस्तंभाला अभिवादन केले जाते. त्यानिमित्त बुलडाणा येथील मलकापूर रोडवरील धम्मगिरीवर भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त आम्ही धम्मबांधव बुलडाणा व महार रेजीमेंट माजी सैनिकांच्यावतीने आज अभिवादन करण्यात आले.यावेळी माजी अप्पर जिल्हाधिकारी रमेश घेंवदे यांच्याहस्ते भीमा कोरेगाव स्तंभाच्या प्रतिकृतीस पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. त्यानंतर माजी सैनिकांनी महार रेजीमेंटचे गीत गावून स्तंभास अभिवादन केले. यानंतर परेड करुन स्तंभाला सलामी देण्यात आली. यावेळी परिसरातील धम्मबांधव उपस्थित होते.
