जनतेज न्युज

मंत्रालयात आत्महत्या करणाऱ्या धर्मा पाटलाना मरणानंतर देखील न्याय नाही; कुटुंबीयांनी केली इच्छा मरणाची मागणी.

प्रतिनिधी , धुळे : शेतीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयात आत्महत्या करणारे शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूस तीन वर्ष उलटूनही न्याय मिळाला नसल्याने, आता त्यांची पत्नी सखुबाई पाटील व मुलगा नरेंद्र पाटी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र पाठवून इच्छा मरणाची परवानगी मागीतली आहे. प्रशासनाकडून अनुदान नव्हे तर प्रकल्पात गेलेल्या शेतीचा योग्य मोबदला देण्याची मागणी धर्मा पाटील यांच्या परिवाराने केली आहे.
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात रहाणारे धर्मा पाटील यांनी 22 जानेवारी 2018 रोजी मंत्रालयात विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने राज्यात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर प्रशासन खडबडुन जागे झाले. यातून पाटील यांच्या आत्महत्येचे कारण भुसंपादनाच्या मोबदल्यात अन्याय झाल्याने केल्याचे पुढे आले.
आता पाटील परिवाराने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवून आपली व्यथा मांडली आहे. ठाकरे सरकारने धर्मा पाटील यांच्या प्रमाणेच त्यांच्या वारसाला आत्महत्येपर्यंत जाणार नाही, याची काळजी घ्यावी तसेच शासनाकडून अनुदान नको असून प्रकल्पासाठी संपादित केलेल्या शेतीचा योग्य मोबदला अपेक्षित असल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले. सरकारने न्याय द्यावा नाहीतर इच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी आता पाटील कुटुंबियांकडून करण्यात येत आहे.