जनतेज न्युज

मनसेची मागणी : कोरोना फायटर कुटुंबीयांसाठी स्वतंत्र कोविड-१९ रुग्णालय उभारा

प्रतिनिधी , मुंबई : देशासह राज्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्वच विभागांत कोरोनाची लागण झालेले रुग्ण सापडत आहेत. राज्यातील लोकडाऊनला आता दीड महिना होत आलेला आहे. तरीही कोरोनाचा प्रसार कमी होताना दिसत नाही. आता नवीन रुग्ण सापडत आहेत. त्यापैकी बहुतांश रुग्ण हे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी असल्याचे निदर्शनास आले आहे. ज्यामध्ये पोलीस, आरोग्य सेवेतील कर्मचारी, पत्रकार मित्र, बेस्ट वाहक-चालकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या कोरोना फायटर आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी स्वतंत्र कोविड-१९ रुग्णालय उभारा. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

वास्तविक कोरोनाविरुद्धच्या लढाईत या सर्वांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यामुळे यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक होते. हे कर्मचारी कर्तव्य बजावण्यासाठी मुंबई, ठाणे व इतर विभागांत नोकरीनिमित्त रोज ये-जा करीत असतात आणि त्यांचा अनेक लोकांशी प्रत्यक्ष संबंध येत असतो. अशा एखाद्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यास सर्व कुटुंबीय, राहात असलेला परिसर, सोसायटी संक्रमित होते आणि सर्वांना होम क्वारंटाईन करण्याची वेळ येते. अशा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यास दुर्दैवाने कोरोनासारख्या आजाराने गाठल्यास इतर कर्मचाऱ्यांचेही मनोधैर्य खचून महामारीला आळा घालण्याची लढाई कमजोर पडू शकते. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांबाबत काहीतरी ठोस निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे. काही दिवसांपूर्वी लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करताना कारखानदारांसाठी काही निर्णय घेण्यात आले होते. उद्योग सुरू करायचा असल्यास कर्मचाऱ्यांची वाहतूक न करता त्याच ठिकाणी सर्व व्यवस्था करावी असा निर्णय घेण्यात आला होता.

तसेच ठाणे जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील जे कर्मचारी आहेत त्यांची नोंद ठेवून त्यांची ते ज्या ठिकाणी कामानिमित्त जात असतील त्याच ठिकाणी कुटुंबासहित सर्वांची निवासाची, खाण्या-पिण्याची योग्य व्यवस्था करणे आवश्यक आहे किंवा या सर्व कर्मचाऱ्यांची येता-जाता शहरांच्या वेशीवर किंवा ते राहात असतील त्या ठिकाणी रोज आरोग्य तपासणी करावी, त्यासाठी तातडीने आरोग्य तपासणी केंद्रे सुरू करावीत व नोंदणी कार्ड सर्व कर्मचाऱ्यांना देऊन त्याची तपासणी अनिवार्य करणे आवश्यक आहे. कारण या सर्व कर्मचाऱ्यांचे आरोग्य सांभाळणे आपले सर्वांचेच कर्तव्य असून हे सुरक्षित राहिल्यास आपण सुरक्षित राहू शकतो. तरी कृपया आपण तातडीने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांबाबत निर्णय घ्यावा तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाल्यास ससेहोलपट झाल्याचीही घटना कानावर येत आहे. त्यासाठी पोलीस, कोरोना फायटर व त्यांच्या कुटुंबीयांसाठी स्वतंत्र कोविड -१९ रुग्णालय ठाणे जिल्ह्यामध्ये असावे, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.