प्रतिनिधी , पुणे : कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी छोट्यांच्या पिग्गी बॅंकपासून मोठमोठे उद्योगपती, सामाजिक संस्था असे सारेच सढळ हाताने मुख्यमंत्री साहाय्यता निधीला मदत करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसेच्या नगरसेवकांनी राज्य सरकारला मदतीचा हात दिला आहे. सर्व नगरसेवकांचे गेल्या महिन्याचे संपूर्ण मानधन मुख्यमंत्री साहाय्यता निधीला देण्यात आले.
या निधीचा धनादेश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ३८ नगरसेवक आहेत. तर शिवसेनेचे नऊ आणि मनसेचे एक अशा एकूण ४८ नगरसेवकांनी आपले एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री साहाय्यता निधीला दिले आहे. महापालिकेतील विरोध पक्षनेते नाना काटेही यावेळी उपस्थित होते. नाना काटे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे पिंपरी-चिंचवड शहरावर बारकाईने लक्ष आहे.
शहरातील रुग्ण तसेच परिस्थिती संदर्भात दररोज त्यांच्याकडून विचारपूस केली जात आहे. शहरातील राष्ट्रवादी, शिवसेना तसेच मनसेच्या नगरसेवकांकडून प्रशासनाला योग्य ते सहकार्य केले जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जे काही निर्णय प्रशासन घेत आहे, त्याला सर्व नगरसेवक प्रतिसाद देत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसेच्या नगरसेवकांनी एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री साहाय्यता निधीला देण्याचे ठरवले होते. त्यानुसार आज एकत्रित असा धनादेश उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला, असे मत काटे यांनी नोंदवले.
