प्रतिनिधी, पुणे : कोरोनाच्या संकटामुळे लांबणीवर पडलेल्या राज्यपाल नियुक्त आमदाराची निवडणुकीची सध्या तरी चर्चा बंद पडली आहे. मात्र या १२ जागांपैकी एका जागेवर आपली वर्णी लागावी यासाठी अनेकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यातच आता विधान परिषदेच्या बारा जागांपैकी एक जागा कुस्ती क्षेत्रातील पैलवानाला मिळावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांची डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (Kesari Chandrahar Patil) यांच्यासोबत नुकतीच भेट झाली. या भेटीत चंद्रहार पाटील यांनी विधान परिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या भेटीत नेमके काय घडले याचा तपशील समजला नाही मात्र, चंद्रहार पाटील यांच्या मागणीवर पवारांनी सकारात्मक विचार केल्याची माहितीही सूत्रांनी दिली.
शरद पवारांची भेट घेतल्यानंतर त्यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, (Jayant Patil) खासदार श्रीनिवास पाटील यांचीही भेट घेतल्याची माहिती पुढे आली आहे. या भेटीदरम्यानही त्यांनी विधानपरिषदेवर काम करण्याची संधी मिळावी अशी मागणी केल्याची माहिती पुढे येत आहे. चंद्रहार पाटील हे सांगली जिल्ह्यातील भाळवणी गावचे रहिवासी आहेत. ते आळसंद जिल्हा परिषद गटातून सांगली जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते. जिल्हा परिषदेत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली होती. तेव्हा त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराव दादा पाटील यांचा आळसंद जिल्हा परिषद गटातून धक्कादायक पराभव केला होता.
या विजयानंतर चंद्रहार पाटील यांची सांगली जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चा होती. चंद्रहार यांनी औरंगाबाद आणि सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी अधिवेशनात महाराष्ट्र केसरीची किताब पटकावला होता. तसेच डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. चंद्रहार पाटील हे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. तसेच खासदार श्रीनिवास पाटील यांच्याशीही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर त्यांना आमदारकी मिळणार काय? याची चर्चा कुस्ती क्षेत्रात सुरु झाली आहे. मात्र शरद पवार यावर कुठला निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.
