जनतेज न्युज

महाराष्ट्रात ठिकठिकाणी अडकलेल्या सर्व भूमिपुत्रांसाठी विशेष बसेसची व्यवस्था करा- प्रवीण दरेकर

प्रतिनिधी , मुंबई : विविध राज्यांमधील परप्रांतीय मजुरांना आपल्या गावी पाठविण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी योग्य आहे. आमचा त्या मागणीला पाठिंबा आहे; पण कोरोनाच्या या संकटांत जो महाराष्ट्रांतर्गत भूमिपुत्र जिल्ह्याजिल्ह्यांत अडकला आहे, जे कोणी स्थानिक भूमिपुत्र व्यवसाय, नोकरी, धंदा, शिक्षण, वैद्यकीय कारणांसाठी विविध ठिकाणी लॉकडाऊनमुळे अडकले आहेत, त्या सर्व स्थानिक भूमिपुत्रांना त्यांच्या घरी जाण्यासाठी राज्य सरकारने विशेष बसेसेची व्यवस्था करण्याची आग्रही मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज केली आहे.

कोरोनोच्या लॉकडाऊनमुळे आपला स्थानिक भूमिपुत्र जिल्ह्यामध्ये अडकला आहे, लॉकडाऊनमुळे जिल्हांतर्गत बंदी असल्यामुळे त्या भूमिपुत्रांना आपापल्या जिल्ह्यात जाता येत नाही. त्यामुळे आज त्या भूमिपुत्रांचे कुटुंबीय चिंतेत आहेत. मग या स्थानिक भूमिपुत्रांचा वाली कोण ? असा सवाल प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

राज्यातील विविध ठिकाणी असलेल्या स्थानिक भूमिपुत्रांसाठी तत्काळ व प्राधान्याने विशेष बस व्यवस्था करावी, अशी मागणी दरेकर यांनी केली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्यामुळे स्थानिक भूमिपुत्र बांधव व भगिनींनी त्यांच्या जिल्ह्यामध्ये जाता यावे यासाठी राज्य सरकारने युद्धपातळीवर बसेसची व्यवस्था करून एक विशेष अभियान राबवावे, असेही दरेकर यांनी नमूद केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.