प्रतिनिधी , मुंबई : भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद तीन दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. कोरेगाव भीमा येथे अभिवादन करण्यासाठी त्यांना जायचे आहे. आज त्यांनी दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहला भेट दिली त्यानंतर दादरच्या चैत्यभूमीला भेट दिली. नवीन वर्ष संघर्षानं सुरु होईल. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचं रक्षण करण्याचं काम करण्याचा निर्धार केल्याचं चंद्रशेखर आझाद यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे लोक कोरेगाव भीमा शौर्य दिवस साजरा करतात. महाराष्ट्र आंबेडकरी चळवळीची मातृभूमी आहे. महाराष्ट्राकडून जास्त अपेक्षा आहे, येत्या काळात येथे आंबेडकरीचळवळ वेगानं वाढेल, असा विश्वास चंद्रशेखर आझाद म्हणाले. महाराष्ट्रात सरकार बदललं आहे. मात्र, जादा फरक झालेला नाही. मागील सरकारच्या तुलनेत हे सरकार बरे आहे, असंही चंद्रशेखर आझाद म्हणाले. दरवर्षी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येण्याचा निर्धार केला होता. मात्र, गेल्या वर्षी तुरुंगात असल्यामुळे येता आले नाही. मात्र, यावर्षी कोणत्याही परिस्थिती कोरेगावा भीमाला जाणार असल्याचे चंद्रशेखर आझाद म्हणाले.
