जनतेज न्युज

महाराष्ट्र संकटात असताना राजकारण सोडून सगळे एकत्र येतात, यावेळीही हेच अपेक्षीत – शरद पवार

सामुहिक शहाणपण हे महाराष्ट्राच्या मातीतच नव्हे तर माणसाच्या मनामनात, रक्तात रूजले आहे
प्रतिनिधी , पुणे : महाराष्ट्र आज साठ वर्षांचा होत आहे. अर्थात यंदा महाराष्ट्राचे हीरक महोत्सवी वर्ष आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत अनेकांचे योगदान आहे. भारतातील सर्वात उत्तम व प्रगतशील राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख कायम आहे. ती निर्माण करताना महाराष्ट्राच्या राजकीय जडणघडणीत सिंहाचा वाटा असलेले अनेक नेते आहेत. त्यातच महाराष्ट्र आणि शरद पवार हे नातं राजकीय पटलावर नेहमीच अतूट नातं राहीलं आहे. महाराष्ट्र साठ वर्षांचा तर पवारांनीही संसदीय कार्याची पन्नास वर्षे पूर्ण केली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या आजवरच्या प्रवासाचे वर्णन करताना कोरोनाच्या संकटातही महाराष्ट्र ज्या एकजूटीने लढत आहे. त्याचे कौतुक केले आहे व सामुहिक शहाणपण हे महाराष्ट्राच्या मातीतच नव्हे तर माणसाच्या मनामनात, रक्तात रूजले आहे असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

ते म्हणाले, सध्या देशातच नव्हे तर जगभरात धार्मिक कट्टरतावादाची विचारधारा फोफावत आहे. देशातदेखील अशी विचारधारा वाढवण्याचे प्रयत्न काही समाजघटक करत आहेत. पण महाराष्ट्र वारकरी संप्रदायाच्या विचारांवर विश्वास ठेवणारा आहे. वारकरी संप्रदाय म्हणजे सर्वसमावेशक. जातीभेद विरहित आणि मानवतेच्या नात्यातून परस्परांशी एकरूप होणारा समाज आहे. याच विश्वासाने महाराष्ट्र कधीही कट्टर धर्मांधतेच्या वाटेवर जाणार नाही. कारण सामाजिक व सामुहिक शहाणपण हे महाराष्ट्राच्या मातीतच नव्हे तर माणसाच्या मनामनात, रक्तात रूजले आहे. त्यावर माझा विश्वास आहे. असे शरद पवार यांनी सांगितले.

तसेच, सध्याच्या राजकीय संकटावर बोलताना पवार म्हणाले, सध्या कोरोनाचे महासंकट राज्यावर आहे. पण महाराष्ट्राचा राजकीय आणि सामाजिक इतिहास पाहिला तर अशावेळी राजकारण विसरून सगळे सोबत येतात. मग
किल्लारीचा भूकंप असेल. मुंबईचे बॉम्बस्फोट असतील किंवा इतर कुठलीही नैसर्गिक विपरीत स्थिती असतील. राजकारण सोडून सगळे एकत्र येतात आणि संकटावर मात करतात. ही येथील संस्कृती आहे. मला वाटते की, याहीवेळी राजकारण विसरून कोरोनासारख्या संकटावर मात करण्यासाठी सर्वांनीच एकत्र यावे. असे आवाहन पवार यांनी केले.

त्याचप्रमाणे, महाराष्ट्राच्या जडणघडणाविषयी भाष्य करताना पवार म्हणाले, शिक्षणाच्या क्षेत्रात महाराष्ट्राने देशातील इतर कोणत्याही राज्यापेक्षा अत्यंत प्रभावी कामगिरी केली. शिक्षण हे असे शस्त्र आहे ज्याचे सार्वत्रिकरण करणे गरजेचे असल्याचे त्यावेळच्या नेत्यांनी जाणले आणि त्यातूनच शैक्षणिक केंद्रे निर्माण झाली. केवळ या शिक्षणावरच अवलंबून न राहता कृषी आधारित शिक्षण निर्मितीला प्राधान्य देत चार कृषी महाविद्यालये निर्माण करणे ही सर्वात मोठी कामगिरी महाराष्ट्राने बजावली. त्यातूनच शिक्षणाची गंगा गोरगरिबांच्या आणि बहुजनांच्या दारापर्यंत पोचली. असे पवार यांनी मुलाखतीत सांगितले. ते सकाळ वृत्तपत्राचे प्रतिनिधी संजय मिस्कीन यांच्याशी बोलत होते.