जनतेज न्युज

महावितरण कार्यालयात रविकांत तुपकर यांनी रोहित्रांसाठी केले 4 तास ठिय्या आंदोलन

प्रतिनिधी, बुलडाणा : शेतकर्‍यांसाठी मोठ्या प्रमाणात विद्युत रोहित्रे मंजूर झाली आहेत व त्यासाठी लागणारा निधीही उपलब्ध झाला असून मे महिन्यात रोहित्रांच्या कामांच्या वर्क ऑर्डरही निघाल्या आहेत. ही सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु पावसाळा सुरू झाला तरी काही ठेकेदारांनी कामे सुरूही केलेली नाहीत. ही प्रलंबित कामे आता पूर्ण करतांना पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. तरी पिकांच्या होणाऱ्या नुकसानीची नुकसान भरपाई देवून महावितरणने ही कामे तात्काळ पुर्ण करावीत, मागणीसाठी बुलडाणा महावितरण कार्यालयात कार्यकारी अभियंता जायभाये यांच्या दालनात रविकांत तुपकरांनी 4 तास ठिय्या आंदोलन केले… रविकांत तुपकरांनी शेलोडी सह इतर गावांतील शेतकऱ्यांना घेऊन महावितरणच्या कार्यालयात ठिय्या मांडला. सर्व शेतकरी मुक्कामाच्या तयारीनेच गेले असल्याने असल्याने त्यांनी तिथेच जेवणही केले. रविकांत तुपकरांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर 4 तासांत महावितरण प्रशासन हादरले. 8 दिवसांच्या आत सर्व कामे पूर्ण करण्याचे त्यांनी लेखी आश्वासन महावितरणने दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. जर महावितरणने दिलेले आश्वासन पाळले नाही तर मात्र महावितरणला आक्रमक आंदोलनाला सामोरे जावे लागेल,असा इशारा यावेळी तुपकरांनी दिला.