जनतेज न्युज

मालाडमध्ये मुंबईच्या ३९ वर्षीय डबेवाल्याचा कोरोनामुळे मृत्यू

प्रतिनिधी , मुंबई : देशभरासह राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. त्यातही मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. यातच मुंबईतील लाखो लोकांना वेळेवर डबे पोहचवणाऱ्या डबेवाल्याचा कोरोनामुळे पहिला बळी गेला आहे. मालाडमधील ३९ वर्षीय डबेवाल्याचा मृत्यू झाला. यामुळे डबेवाल्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मालाड येथे राहणारे ३९ वर्षीय संतोष रामचंद्र जाधव हे डबेवाले म्हणून गेली १५ वर्षे कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी त्यांना ताप येत होता. त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. उपचार सुरू असताना त्यांची तब्येत अधिक बिघडल्याने बुधवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यामागे आई, वडील, पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे.

मुंबईत कोरोना संसर्ग वेगाने पसरत असला तरी अजूनपर्यंत डबेवाले कोरोना आजारापासून दूर होते. परंतु संतोष जाधव यांच्या मृत्यूने डबेवालेही कोरोनाच्या कवेत आल्याचे दिसते. संतोष जाधव यांच्या मृत्यूने डबेवाल्यांना धक्का बसला आहे.

दरम्यान, लॉकडाऊनमध्ये डबेवाल्यांंनीही आपली सेवा थांबवली होती. तरीदेखील बाधा झाल्याने सर्वांनी काळजी घ्यावी, तसेच डबेवाल्यांना काही समस्या आल्यास त्यांनी तत्काळ संघटनेशी संपर्क करण्याचे आवाहन मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केले आहे.