प्रतिनिधी , मुंबई :- सोशल मीडियावर उद्योगपती रतन टाटांच्या नावे मेसेज व्हायरल होत आहे. अर्थव्यवस्थेच्या बिघडलेल्या परिस्थितीवर सगळेच काळजी व्यक्त करत आहेत, या परिस्थितीतून सकारात्मकतेकडे नेणारा संदेश टाटांनी दिला असे या मेसेजमध्ये लिहिले होते . मात्र सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेजमधले विचार हे माझे नाहीत, हा मेसेज फेक आहे असे ट्विट स्वत: रतन टाटा यांनी केले आहे.
‘माझ्या नावे फिरणाऱ्या या पोस्टमधली वाक्य माझी नाहीत किंवा मी लिहिलेली नाहीत. त्यामुळे मी आपल्याला विनंती करतो की असे मेसेज व्हायरल करण्यापूर्वी खातरजमा करुन घ्या. मला काही सांगायचं असेल तर मी माझ्या अधिकृत माध्यमातूनच तुमच्यापर्यंत पोहोचवेन, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, तसेच प्रत्येकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
देशभरामध्ये कोरनाचा प्रादुर्भाव दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. अशातच अनेक उद्योगपतींनी आणि सेलिब्रिटीजने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी मदत निधी दिला आहे. टाटा ग्रुप्सचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनीही ५०० कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा दोन आठवड्यांपूर्वी केली होती. त्यानंतर लगेचच टाटा सन्सनेही एक हजार कोटींच्या मदतीची घोषणा केली होती. या आर्थिक मदतीबरोबर टाटा ग्रुप्सच्या माध्यमातून डॉक्टरांच्या जेवणाची आणि राहण्याचीही सोय करण्यात आली आहे. त्यामुळेच इंटरनेटवर रतन टाटा सध्या चर्चेचा विषय आहे.
